प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी साधला स्वयंसेवी संस्थांची संवाद : वनराई बंधारे बांधण्याबाबत केले नियोजन
कणकवली,दि. ५ आॅक्टोबर
कणकवली तालुक्यातील दृष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा. लोकसहभागातून जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधले पाहिजेत.पाणी अडविण्यासाठी घालण्यात येणारे बंधारे गुणवत्तापूर्ण बांधण्यात यावेत,अशा सूचना प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिल्या.
दृष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने कणकवली तहसील कार्यालयात प्रांताधिकारी जगदिश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत संवाद साधला. या बैठकीला तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ, नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवकर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे राजेश रेगे, प्रा. हरिभाऊ भिसे, स्नेहसिंधुचे संदीप राणे, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अॅड. एन. आर. देसाई, मंदार सापळे, हॉटेल विक्रेते संघाचे संतोष काकडे, अर्जुन राणे, ज्येष्ठ पत्रकार गणेश जेठे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, आर्ट आॅफ लिव्हिंग उमेश वायंगणकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अनिल डेगवेकर, ग्रामसेवक संघटनेचे प्रशांत वर्दम यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व महसूलचे कर्मचारी उपस्थित होते.
संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी गावस्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात करण्याची सूचना प्रतिनिधींनी केली. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी काय काय उपाययोजना व नियोजन करता येईल, यावर चर्चा झाली. बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट सामाजिक संस्थांनी घेतले. दृष्काळाचा मुकाबला करण्यासाठी पाणी व चारा नियोजन करावे. तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे बंधारे बांधण्यासाठी स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांना पिशव्या उपलब्ध करून दिल्या जातील, असे राजेश रेगे यांनी सांगितले. बंधारे बांधण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध करून देण्याच येईल, असे संतोष काकडे यांनी सांगितले. कणकवली तालुक्याला २ हजार वनराई व कच्चे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या उद्दिष्टपूतेसाठी प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे, अशी सूचना गणेश जेठे यांनी केली. बंधारे बांधण्यासाठी कणकवली कॉलेजच्या एनएसएसच्या स्वयंसेवक मदत करतील, असे अनिल डेगवेकर, प्रा. हरिभाऊ भिसे यांनी सांगितले. गावातील पाणथळ भागाचा अभ्यास करून त्यानुसार पाणी अडविण्याचे नियोजन करावे, असे संदीप राणे यांनी सांगितले.
वनराई व कच्चे बंधारे बांधण्यासाठी अंदाजे किती खर्च येईल, याची माहिती देण्यात यावी, अशी सूचना अॅड. एन. आर. देसाई यांनी मांडली. यावर प्रवीण ओहोळ यांनी एक बंधारा बांधण्यासाठी साधारण ५ हजार खर्च येत असल्याचे सांगितले. गडनदी व जानवली यासह अन्य नदीपात्रांतील पाण्यावर चालणाऱ्या नळयोजनांचा देखील अभ्यास करण्यात यावा, अशी सूचना संदीप राणे यांनी केली. बैठकीत सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्याचे ठरले. या ग्रुपमध्ये बंधारे बांधण्याबाबत व संभाव्य पाणी टंचाई टाळण्याबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनाच्या नियोजनाची माहिती टाकण्याचे ठरले. तालुक्यात सिमेंट टाईपचे बंधारे बांधण्यात आले आहेत, त्यात गाळा साचला असून तो काढण्यात यावा, अशी सूचना काही प्रतिनिधींनी मांडली. काही गावांमध्ये मनुष्यबळाची कमरता आहे, त्याठिकाणी वनराई बंधारे बांधण्यासाठी मनुष्यबळ किंवा यंत्रसमुग्री उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत मदत कार्य करावे. ग्रा. पं. व्यवस्थेकडून बांधण्यात येणाऱ्या वनराई बंधाऱ्याच्या कामात स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावावा, अशा सूचना प्रशांत वर्दम यांनी मांडल्या. बैठकीत संभाव्य पाणी टंचाई व दृष्काळाचा मुकाबला करण्यासाठी काय काय उपाययोजना करता येईल, यावर चर्चा झाली. यापुढील काळात तालुक्यातील दृष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी सांघिकपणे काम करण्याचे ठरले.