कणकवली :
ज्ञानयोगी, प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांची १४५ वी जयंती कणकवली पंचायत समितीच्या वतीने अत्यंत साजरी करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
श्री गुलाबराव महाराजांचा जन्म ६ जुलै १८८१ रोजी अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माधान येथे झाला. वयाच्या अवघ्या नवव्या महिन्यातच त्यांना संपूर्ण अंधत्व आले होते. मात्र, शारीरिक मर्यादांना न जुमानता त्यांनी आपल्या ‘अंतर्दृष्टी’ने ज्ञानाची नवनवीन शिखरे सर केली. वेद-वेदांतापासून ते संगीत, वैद्यक शास्त्र, साहित्यशास्त्र, तत्त्वज्ञान, आधुनिक विज्ञान, थिऑसॉफी आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान अशा विविध विषयांवर त्यांनी तब्बल १३४ ग्रंथांची रचना केली आहे. अवघ्या ३४ वर्षांच्या अल्प आयुष्यात सनातन मानव धर्मासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे.
या जयंती कार्यक्रमास कणकवली पंचायत समितीच्या सभापती श्रीम. हर्षदा वाळके, उपसभापती श्री. राजेश (सोनू) सावंत आणि पंचायत समिती सदस्य श्री. सहदेव (अण्णा) खाडये उपस्थित होते.
यावेळी प्रशासकीय पातळीवरून गट विकास अधिकारी (उच्चस्तर वर्ग-१) श्री. अरुण चव्हाण, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. मंगेश वालावलकर यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांना आदरांजली वाहिली.