राजकीय भूमिका वेळ आणि परिस्थितीनुसार ठरवणार ; माझे रविंद्र चव्हाण व राष्ट्रवादीतील नेत्यांशी चांगले संबंध आहेत
कणकवली,दि.०७ सप्टेंबर
गेल्या दीड वर्षापासून राजकारणापासून काहीसे अलिप्त आहे. मी राजकारणापासून दूर गेलेलो नाही. माझे सामाजिक कार्य सुरूच आहे. मात्र, राजकीय भूमिका ही आधीच ठरवून ठेवता येत नाही. त्या वेळची परिस्थिती आणि जनतेच्या हितानुसार निर्णय घेतला जाईल. माझे रविंद्र चव्हाण व राष्ट्रवादीतील नेत्यांशी चांगले संबंध आहेत . आता पालकमंत्री नितेश राणे व राणे कुटुंबातील सदस्यांना जनतेने संधी दिली आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा काम करावे, असा टोला भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी लगावला.
कणकवली येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,
राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांमधील आपल्या राजकीय प्रवास आहे. प्रत्येक पक्षात काम करताना आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिलो. ज्या ठिकाणी वैचारिक मतभेद झाले, तिथे केवळ राजकीय स्वार्थासाठी तडजोड केली नाही. माझे वैचारिक मतभेद जिथे झाले, तिथे मी कधीही राहिलो नाही. माझ्या तत्वांशी तडजोड करणे माझ्या रक्तातच नाही. पक्षाच्या नेतृत्वाकडून आपल्या विचारांना योग्य साथ मिळत नसेल तर उगाच कोणाच्या मागे फरफटत जाणे मला मान्य नाही. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पवार कुटुंबीयांशी असलेल्या संबंधांचा उल्लेख केला. सामाजिक कार्यासाठी सत्तेची किंवा सत्ताधाऱ्यांची मदत लागते, ती मला मिळते. त्यामुळे कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. माझे वैयक्तिक प्रश्न मी स्वतः सोडवू शकतो. मात्र, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांचा उपयोग करेन, असा इशारा अतुल रावराणे यांनी दिला आहे.
नितेश राणेंना कामासाठी वेळ द्यायला हवा
राणे कुटुंबीयांशी माझे वैचारिक मतभेद राहिले आहेत आणि त्या त्या वेळी मी माझी भूमिका ठामपणे मांडली आहे. मात्र आज नितेश राणे यांना सिंधुदुर्गातील जनतेने निवडून दिले आहे. पालकमंत्रीपद पक्षाने दिले असले तरी त्यांना आमदार म्हणून निवडून जनतेनेच दिले आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. पालकमंत्री झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विकासकामे होणार नाहीत. कोणाकडे जादूची कांडी नसते. त्यांना दोन-अडीच किंवा तीन वर्षे काम करण्यासाठी द्यावीत. त्यानंतर जनतेचा प्रतिसाद काय आहे, जिल्ह्याचा विकास किती झाला आहे, यावर जनतेची भूमिका असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भले, जिल्ह्याचा विकास आणि जनतेचा फायदा जिथे असेल, तिथे मी 100टक्के त्या कामाच्या बाजूने असेन. व्यक्ती कोण आहे किंवा पक्ष कोणता आहे, यापेक्षा जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा आहे, असे अतुल रावराणे यांनी सांगितले.