कणकवली,दि.०५ सप्टेंबर
ओरोस रेल्वे स्थानक परिसरात आढळून आलेल्या बारा वर्षीय मुलाच्या नातेवाईकांचा कणकवली पोलिसांनी शोध घेत त्याला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे. लवेश गुरुदास गुरव (वय १२, इयत्ता सातवी, रा. सांताक्रुझ, मुंबई) हा मुलगा ओरोस रेल्वे स्थानकावर आढळून आला होता. त्याने आपले गाव कणकवली असल्याचे सांगितल्यानंतर एका स्थानिक रिक्षाचालकाने त्याला कणकवली पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलीसांनी चक्रे फिरवत त्याला नातेवाईकांच्या स्वाधिन केले आहे.
यावेळी कणकवली पोलीस सुदेश तांबे , पोलीस हवालदार मिलींद देसाई यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते.
याबाबत अधिक वृत्त असे की, कणकवली पोलीस ठाण्यात लवेश गुरव या मुलाला आणल्यानंतर तातडीने कणकवली पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्या गावातील संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला. त्यानंतर मुलाचे नातेवाईक रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वाकेड येथे राहत असल्याची समजले. त्यानंतर कणकवली पोलिसांनी वाकेड येथील स्थानिक पोलीस पाटील तसेच संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मुलाच्या नातेवाईकांशी संपर्क केला. त्यानंतर शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजता लांजा-वाकेड येथील त्याचे काका विजय कृष्णा गुरव आणि गावचे पोलीस पाटील जयवंत सावंत यांच्या स्वाधीन लवेश गुरव याला स्वाधिन करण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे बारा वर्षीय मुलाला सुरक्षितपणे त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याने कणकवली पोलीसांचे कौतुक होत आहे.