कणकवली : गणेश चतुर्थीनिमित्त २४०० महिला मत्स्यव्यावसायिकांना कडधान्य वाटप

शेअर करा

सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेचा सलग १४ व्या वर्षी उपक्रम

कणकवली,दि.०९ सप्टेंबर

गणेश चतुर्थीच्या सणाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेच्या वतीने सलग १४ व्या वर्षी जिल्ह्यातील महिला मत्स्यव्यावसायिकांसाठी कडधान्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. ना-नफा, ना-तोटा या तत्त्वावर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुमारे २ हजार ४०० महिला सभासदांना प्रत्येकी १० किलो कडधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

आचरा विभागातील महिला मत्स्यव्यावसायिकांना कडधान्य वाटप करताना सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर, संस्थेचे संस्थापक तथा गाबीत समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, गौरी सारंग, श्रीमती सुमाली चोपडेकर, रंजना खराडे, आदित्य केरकर यांच्यासह बहुसंख्य महिला मत्स्यव्यावसायिक उपस्थित होत्या.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर म्हणाल्या, संस्थेची स्थापना झाल्यापासून गेली १४ वर्षे गणेश चतुर्थीच्या सणानिमित्त गोरगरीब महिला मत्स्यव्यावसायिकांना मदत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. महिला सभासदांकडूनही या उपक्रमाला दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी प्रत्येक महिला सभासदाला पावटे, मूगडाळ, चणाडाळ, काळे वाटाणे, हिरवे वाटाणे, चणे, चवळी, गूळ, रवा आणि गोडेतेल प्रत्येकी एक किलो या प्रमाणात एकूण १० किलो साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील कर्ली, पाट, परुळे, केळूस, देवबाग, तारकर्ली, वायरी, देवली, दांडी, धुरीवाडा, मालवण शहर, कोळंब, सर्जेकोट, तळाशील, तोंडवली, रेवंडी, आचरा आदी किनारपट्टी भागातील सुमारे २ हजार ४०० महिला सभासदांना या उपक्रमाचा लाभ मिळाला.

महिला मत्स्यव्यावसायिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा

आचरा येथील कडधान्य वाटप कार्यक्रमात बोलताना संस्थेचे संस्थापक चंद्रशेखर उपरकर यांनी संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर आणि त्यांच्या सहकारी सभासदांनी या उपक्रमासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले.

गेल्या १४ वर्षांपासून महिला मत्स्यव्यावसायिकांच्या व्यवसायातील अडचणी दूर करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्य सुविधा, मासे विक्रीच्या ठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा, मच्छीमार मार्केटची व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संस्थेने सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच मच्छीमारांची घरे त्यांच्या नावे व्हावीत यासाठी मालवण, देवगड आणि वेंगुर्ला येथे महिला मत्स्यव्यावसायिकांचे मोर्चे काढण्यात आल्याचे चंद्रशेखर उपरकर यांनी सांगितले.

मत्स्य दुष्काळाच्या काळात शासनाकडून महिला मत्स्यव्यावसायिकांना ६ हजार रुपयांचे अनुदान मंजूर व्हावे, यासाठी धरणे आंदोलन व आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या पाठपुराव्यामुळे सुमारे १ हजार ५०० महिलांना न्याय मिळवून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय मत्स्य विभागाच्या मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदानातून सुमारे ५० महिला मत्स्यव्यावसायिकांना घरोघरी मासे विक्री करण्यासाठी ई-स्कुटर उपलब्ध करून देण्यात आले, त्यामुळे त्यांना रोजगाराची नवी संधी मिळाल्याचेही उपरकर यांनी नमूद केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू महिला मत्स्यव्यावसायिकांना मिळवून देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पाच हजार रुपयांच्या अपघाती विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

दरम्यान, राज्य शासनाच्या मत्स्यसंपदा योजनेतून उपलब्ध असलेल्या नि:शुल्क ५ हजार रुपयांच्या अपघाती विमा योजनेचा महिला मत्स्यव्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी केले. गणेश चतुर्थीनंतर मत्स्य अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील महिला मत्स्यव्यावसायिकांची विमा योजनेसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महिला मत्स्यव्यावसायिकांनी संस्थेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

शेअर करा