स्टॉलधारकांना कापडी व कागदी पिशव्यांचे वाटप; महिला पदाधिकाऱ्यांकडून उपक्रमाचे कौतुक
कणकवली,दि.०५ सप्टेंबर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्णानंद महिला मंच, कणकवली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री महोत्सवाला रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला भेट देत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
पर्यावरणपूरक पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या विक्री महोत्सवात प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या वतीने स्टॉलधारकांना मजबूत कागदी पिशव्या भेटीदाखल देण्यात आल्या. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच प्लास्टिकचा वापर कमी करण्यास हातभार लागणार आहे.
यावेळी रोटरी क्लब कणकवली, रोटरॅक्ट क्लब कणकवली तसेच इनर व्हील क्लब कणकवली (डिस्ट्रिक्ट ३१७) यांच्या पदाधिकाऱ्यांनी महोत्सवस्थळाची पाहणी केली. तसेच प्रदर्शनात उपलब्ध असलेल्या विविध वस्तूंची माहिती घेतली.
यावेळी सौ. सुप्रिया नलावडे, नगरसेविका मेघा गांगण, राजश्री रावराणे, सौ. अंधारी , कांबळी यांच्यासह रोटरी, रोटरॅक्ट व इनर व्हील क्लबचे पदाधिकारी तसेच पूर्णानंद महिला मंचाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सौ. सुप्रिया नलावडे यांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल पूर्णानंद महिला मंचाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी पूर्णानंद महिला मंचाच्या विविध विधायक उपक्रमांना भविष्यातही सक्रिय सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शन व विक्री महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
महिलांच्या कलागुणांना, कौशल्याला आणि स्वावलंबनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. पूर्णानंद महिला मंचाच्या अध्यक्षा सौ. सुलभा सामंत आणि कार्यवाह सौ. मृणाल ठाकूर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.