कणकवली,दि.०२ जुलै
रोटरी परिवार कणकवलीच्या वतीने कै. दादासाहेब कुडतरकर यांच्या स्मरणार्थ इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १० जुलै २०२६ (शनिवार) रोजी सकाळी ८.३० वाजता विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवलीच्या सभागृहात होणार आहे.
स्पर्धेसाठी “ज्येष्ठ नागरिक : शाप की वरदान?”, “विकासाची कास धरणारा मोबाईल” आणि “व्यसनाच्या मोहजालात अडकलेली युवा पिढी” हे तीन विषय देण्यात आले असून, स्पर्धकांनी यापैकी कोणत्याही एका विषयावर मराठी भाषेत सात मिनिटांचे भाषण करायचे आहे.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी शालेय ओळखपत्र किंवा मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून, स्पर्धेसाठी नावनोंदणी दि. ६ जुलै २०२६ पर्यंत श्रीम. नेहा सावंत (मो. ९४२११४८०५३) यांच्याकडे करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांसह उत्तेजनार्थ स्पर्धकांना ट्रॉफी, भाषण कौशल्यावर आधारित विशेष पुस्तक भेट व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
या उपक्रमासाठी विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली तसेच कुडतरकर कुटुंबीय यांचे विशेष सहकार्य लाभले असून, स्पर्धेचे इव्हेंट चेअरमन रो. अँड. दीपक अंधारी आहेत. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या वक्तृत्व स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी परिवार कणकवलीने केले आहे.