कणकवली : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानासाठी सहा प्रस्तावांना मंजुरी

शेअर करा

कणकवली तहसील कार्यालयात तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समितीची बैठक; शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या प्रस्तावांवर निर्णय.

कणकवली ,दि.१७ जुलै

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत तालुकास्तरीय समितीची बैठक कणकवली तहसील कार्यालयात पार पडली. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेल्या सहा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

बैठकीस गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. समितीने प्राप्त प्रस्तावांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजुरी दिली.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत कणकवली तालुक्यातील शेतकरी व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून संबंधित वारसांना दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. या योजनेतील प्रस्तावांची छाननी व अंतिम मंजुरी तहसीलदार अध्यक्ष असलेल्या तालुकास्तरीय समितीमार्फत केली जाते.
आजच्या बैठकीत मंजूर झालेल्या सहा लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये, असे एकूण १२ लाख रुपयांचे शासकीय आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले असून, लवकरच ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या वारसांना वितरित करण्यात येणार आहे.

शेअर करा