कणकवली तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या व्यवस्थेबाबत विशेष पाहणी मोहिम

शेअर करा

पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनुसार सभापती , उपसभापतींकडून शाळांना भेटी; विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक व मूलभूत सुविधांचा घेतला आढावा

कणकवली,दि.०७ सप्टेंबर

कणकवली तालुक्यातील पूर्ण प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक प्रगती साधताना तेथील व्यवस्था सक्षम व्हावी, या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार विविध शाळांमध्ये सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनु सावंत विशेष पाहणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यांत वरवडे, बिडवाडी, कलमठ, आशिये, फणसनगर आदी शाळांना भेट देत विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक सुविधा आणि मूलभूत सोयी योग्य पद्धतीने उपलब्ध होत आहेत की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यावेळी सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनु सावंत , जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री तसेच पंचायत समिती सदस्य गुरु वर्देकर यांनी शाळांना भेट देऊन विविध सुविधांचा आढावा घेतला.
यावेळी सभापती व उपसभापतींनी शाळेतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, वर्गखोल्यांची स्थिती, परिसरातील स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची गुणवत्ता याची माहिती घेत आढावा घेतला. पोषण आहार तयार केला जाणाऱ्या स्वयंपाकघराची स्वच्छता आणि आवश्यक सुविधांची पाहणी केली. तसेच वर्गखोल्यांमध्ये आवश्यक प्रकाश व्यवस्था, संगणक कक्ष, डिजिटल फलक तसेच इतर शैक्षणिक साधने कार्यरत आहेत की नाहीत? याची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक प्रगती आणि शाळेतील एकूण शैक्षणिक वातावरणाबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांकडून आढावा घेण्यात आला.

या भेटीदरम्यान, लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी व अनुभव जाणून घेतले. नियमित अभ्यास, शाळेतील उपस्थिती आणि शिक्षणातून प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. तसेच शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त करतानाच ज्या ठिकाणी किरकोळ दुरुस्ती किंवा सुविधांमध्ये त्रुटी आढळल्या, त्या तातडीने दूर करण्याच्या सूचना मुख्याध्यापक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षणासोबतच आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, ही पालकमंत्री नितेश राणे यांची भूमिका आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने सतर्क राहून शाळांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशा सुचना लोकप्रतिनीधींना आहे. त्यानुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पाहणी दौऱ्यावेळी स्थानिक ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

शेअर करा