कणकवली : नाटळ येथे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विशेष टीबी कॅम्प संपन्न

शेअर करा

ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती

कणकवली,दि. १२ जून

प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत नाटळ येथे विशेष आरोग्य शिबिर आणि टीबी (क्षयरोग) तपासणी कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये परिसरातील बहुसंख्य नागरिकांची आरोग्य तपासणी करून विविध महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती दिसत होती.


या शिबिरादरम्यान आरोग्य पथकाद्वारे नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. डिजिटल एक्सरे द्वारे छातीची तपासणी आणि इतर रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या. तसेच पात्र लाभार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचारही देण्यात आले. एक्स-रे व्यतिरिक्त ईसीजी कॅम्प,आरोग्य तपासणी टेली मेडिसिन विभागांतर्गत आरोग्य तपासणी,आयुष्यमान भारत कार्ड काढणे,वय वंदना कार्ड तयार करणे इत्यादी सेवा देण्यात आल्या.


शिबिरात उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टीबीच्या प्रमुख लक्षणांबद्दल मार्गदर्शन केले. “दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असणे, संध्याकाळी ताप येणे, वजन कमी होणे आणि रात्री घाम येणे ही टीबीची लक्षणे असू शकतात,” असे त्यांनी सांगितले. टीबी हा आजार नियमित उपचाराने पूर्णपणे बरा होऊ शकतो, त्यामुळे आजार लपवून न ठेवता वेळेवर तपासणी करण्याचे आवाहन यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले.


नाटळ आणि परिसरातील वाड्यांमधील नागरिकांनी या शिबिराचा मोठा लाभ घेतला. गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. वेळेत निदान आणि उपचार करून नाटळ गाव पूर्णपणे क्षयमुक्त करण्याचा संकल्प याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
यावेळी सरपंच सुनील घाडीगावकर, ग्रामअधिकारी माने, डॉ. प्रतीक कांबळे, दीपक पोवार, डॉ. श्रावणी काणेकर, डॉ गोरे, तेजस्वी राऊळ तसेच आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


फोटो ओळी : नाटळ ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विशेष टीबी कॅम्पचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या विविध चाचण्या डॉ.गोरे व डॉ. श्रावणी काणेकर यांनी केल्या.

शेअर करा