सावंतवाडी, दि. ४ जुलै
सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावातील मऱ्हाटवाडी-बेरडकी येथे शनिवारी मध्यरात्री निसर्गाने अक्षरशः थैमान घातले. पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास प्रचंड वेगाने सुटलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण केली. या वादळाच्या तडाख्यात २४ हून अधिक गरीब कुटुंबांची घरे काही क्षणांत उद्ध्वस्त झाली असून, एका वृद्धाचे घर पूर्णपणे कोसळले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र अनेक कुटुंबांचे आयुष्यभराचे कष्ट काही मिनिटांत मातीमोल झाले आहेत.
शनिवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना अचानक वादळाने झोडपायला सुरुवात केली. घरांवरील सिमेंटचे पत्रे हवेत उडाले, तर कौलारू घरांची छपरे छिन्नविच्छिन्न झाली. अचानक आलेल्या या संकटामुळे झोपेत असलेली लहान मुले, महिला आणि वृद्ध जीव मुठीत धरून घराबाहेर धावले. महार्टवाडी-बेरडकीतील बहुतांश घरे ७० ते ८० वर्षे जुनी, मातीची व कौलारू असल्याने वादळाचा सर्वाधिक फटका या कुटुंबांना बसला. आंबोली परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने, छप्पर उडालेल्या या नागरिकांसमोर आता डोक्यावर छप्पर शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
या कुटुंबांचे झाले अतोनात नुकसान:
या भीषण आपत्तीत सप्तवती पांडुरंग नाईक, ज्ञानेश्वर वसंत नाईक, एकनाथ वसंत नाईक, कृष्णा पुंडलीक नाईक, संदीप नामदेव नाईक, आनंद नामदेव नाईक, उत्तम लक्ष्मण नाईक, रमेश लक्ष्मण नाईक, परशुराम मारुती नाईक, चंद्रकांत दत्ताराम नाईक, संजय तुकाराम नाईक, मधू मश्नु नाईक, सकराम मश्नु नाईक, कृष्णा दत्ताराम नाईक, संतोष दत्ताराम नाईक, पांडुरंग दत्ताराम नाईक, बाबू नाईक, सुरेश नाईक, सोम बुधाजी नाईक, यशवंत बुधाजी नाईक, संजय प्रभाकर नाईक, भिरू सखाराम नाईक, पांडुरंग नाईक आणि तानाजी नाईक यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मोलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची टांगती तलवार:
बाधित वाडीतील बहुतांश नागरिक हे रोजंदारी आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. “दिवसाची मजुरी मिळाली तरच चूल पेटते”, अशी येथील परिस्थिती आहे. अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत घरांची पुन्हा दुरुस्ती करणे या कुटुंबांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे शासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने आर्थिक मदत, ताडपत्री, बांधकाम साहित्य आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, अशी आर्त मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
तास उलटले तरी प्रशासन गायब; ग्रामस्थांमध्ये संताप!
एवढी मोठी दुर्घटना घडून आणि अनेक तास उलटून गेले तरी अद्याप कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी पंचनामा करण्यासाठी अथवा पाहणीसाठी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “संकट आमच्यावर कोसळले आहे, पण आमचे अश्रू पुसायला प्रशासन कधी धावणार?” असा संतप्त सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रशासकीय अनास्थेबद्दल तीव्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.