कणकवली : नांदगाव येथील अवैध दारु धंद्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर कडक कारवाई

शेअर करा

सरपंच रविराज मोरजकर यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार ; दारु विक्रेत्यांना दिलेल्या इशाऱ्याबद्दल असलदे ग्रामस्थांचे कौतुक

कणकवली,दि. ११ जून

कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात अखेर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे, ही कारवाई पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार झाली आहे.त्याबद्दल सरपंच रविराज मोरजकर यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहे.तसेच दोन दिवसापूर्वी असलदे ग्रामस्थांनी दारू विक्रेते अवधूत वाळके व श्री.वायगणकर यांना सज्जड दम दिला,त्यामुळे नांदगाव तिठा येथे राजरोस होणारी दारु विक्री बंद झाली आहे,त्याबद्दल असलदे ग्रामस्थांचे कौतुक असल्याचे सरपंच रविराज मोरजकर यांनी म्हटले आहे.

नांदगाव – असलदे परिसरात राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याबाबत ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याने सरपंच रविराज मोरजकर यांनी हा विषय पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मांडला. ग्रामसभेच्या ठरावांच्या प्रती सादर करून अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली होती,याची गंभीर दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नाराजी व्यक्त करत संबंधितांवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा पोलिस आणि कणकवली पोलिसांनी हालचाल करत मध्यरात्री छापा टाकून संशयित आरोपी अवधूत वाळके याच्यावर कारवाई केली.

दरम्यान,अवधूत वाळके आणि सुरेंद्र वायंगणकर हे दोघेही शेजारील असलदे गावातील रहिवासी असून, असलदे ग्रामस्थांनीही त्यांना अवैध दारू विक्री थांबविण्याची समज दिली.तसेच गावाची बदनामी होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचा इशारा मंगळवारी रात्री दिला. असलदे ग्रामस्थांच्या या भूमिकेचे नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे,असे रविराज मोरजकर म्हटले आहे.

तसेच, अवधूत वाळके आणि सुरेंद्र वायंगणकर या दोन्ही आरोपींना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी समज दिली असून, त्यांच्याकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बंधपत्र घेण्यात आले आहे. याशिवाय त्यांना दररोज ओरोस येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या कारवाईनंतर नांदगाव परिसरातील अवैध दारू विक्री बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पालकमंत्री नितेश राणे, यांचे आभार मानत असल्याचे रविराज मोरजकर यांनी सांगितले.

शेअर करा