कणकवली : विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतल्यास भविष्यात यश निश्चित- संदेश पारकर

शेअर करा

कणकवली नगरपंचायतीतर्फे दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा


कणकवली ,दि.१३ जुलै
गुणवत्ताच ही आजच्या काळातील खरी संपत्ती आहे. शिक्षणाच्या जोरावर कोणताही विद्यार्थी मोठे यश मिळवू शकतो. गरिबी हा शिक्षणाचा अडथळा नसून जिद्द, मेहनत आणि सातत्य यांच्या बळावर प्रत्येकजण आपले ध्येय गाठू शकतो. विद्यार्थ्यांनी स्वतःचे ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम घेतल्यास भविष्यात निश्चित यश मिळेल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.

कणकवली नगरपंचायतीतर्फे कोकण विभागीय बोर्डाच्या दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कणकवली येथील एचपीसीएल सभागृहात पार पडला. यावेळी संदेश पारकर बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर,प्रा.हरिभाऊ भिसे ,प्रा.दिवाकर मुरकर, नगरसेवक संकेत नाईक, जय धुमाळे, बाळू पारकर, लुकेश कांबळे, नगरसेविका समिधा अंधारी, जुई मुरकर, दीपिका जाधव, धीरज मेस्त्री, नेहा तळेकर कर व प्रशासकीय अधिकारी, अमोल भोगले सहाय्यक प्रकल्प अधिकारी, प्रशांत राणे, मनोज धुमाळे, प्रवीण गायकवाड, पूजा तांबे, दिव्या सर्पे , विनोद जाधव, सुजल मुणगेकर , निकिता पाटकर , रुचिता ताम्हाणेकर , माधुरी वगरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी,पालक, विद्यार्थी व शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, नगरपंचायतीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नगरपंचायतीच्या वतीने सन्मान व्हावा, अशी सर्वांची भावना होती. त्यानुसार हा उपक्रम प्रा. दिवाकर मुरकर व अन्य सहकारांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. कणकवली हे कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन , परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या यांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेली भूमी आहे.

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक म्हणाले, स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने निश्चित ध्येय ठेवून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. दहावी आणि बारावी हे आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे असून त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. यावेळी प्रा. हरिभाऊ भिसे यांनी मनोगत व्यक्त करताना संदेश पारकर यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.

शेअर करा