राज्य सरकारी , निमसरकारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय संघटनांचा इशारा ; कणकवलीत प्रांताधिका-यांचा केला निषेध
कणकवली,दि.२९ जून
कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी देवगड येथील बीएलओ प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी निषेध करण्यासाठी सोमवारी राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने कणकवलीत आंदोलन करण्यात आले. विविध १५ संघटनांनी एकत्र येत कणकवली प्रांताधिका-यांचा निषेध आंदोलन छेडले. यावेळी या समन्वय संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर यांनी या आंदोलनादरम्यान संबंधित प्रांताधिका-यांनी ५ वाजेपर्यंत येवून सर्वांसमोर माफी मागावी , असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त संघटनांच्या प्रतिनीधींनी आक्रमक भूमिका मांडत प्रांताधिका-यांनी दिलेल्या वागणूकीबद्दल निषेध नोंदवला. त्यानंतर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या आंदोलनात फोनद्वारे भूमिका मांडत आपण अधिवेशनात लक्षवेधी मांडली असून त्यावर उद्या चर्चा होईल. कणकवली प्रांताधिका-यांचे निलंबन करण्याची मागणी केली जाईल, तेव्हा यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत निलंबन होत नाही , तोपर्यंत बीएलओचे काम करणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी , निमसरकारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय संघटनांच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन सोमवारी दुपारी ३ वाजल्यापासून कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आले. यावेळी सर्व संघटनांचे प्रतिनीधी , राज्यातील शिक्षक संघटनांचे नेते सहभागी झाले होते. यावेळी सर्व संघटनांच्या प्रतिनीधींनी प्रांताधिका-यांकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या वागणूकीबद्दल तीव्र शब्दांत भावना मांडण्यात आल्या.
यावेळी समन्वय समिती अध्यक्ष राजन कोरगावकर, शिक्षक समिती राज्य नेते, उदय शिंदे कार्याध्यक्ष सयाजी पाटील, सखाराम सकपाळ, राजन वालावलकर, वामन तर्फे,विनोदसिंह पाटील, संजय वेतुरेकर,विठ्ठल गवस,सचिन मदने, तुषार आरोसकर, सुशांत मर्गज,नरसू रेडकर निलेश ठाकूर,राजा कविटकर,दिनेश म्हाडगूत, भाई चव्हाण,धीरज गोळे, सुरेश पाटील,राजु वजराटकर संदीप कदम,प्रशांत वर्दम, पालव, सुहास सावंत, लक्ष्मण वळवी, महादेव देसाई, संतोष वारंग,नामदेव जांभवडेकर,निकिता ठाकूर, संजना ठाकूर, प्रशांत आडेलकर, दिलीप मसके, नंदकुमार राणे,बालाजी वाघमोडे, टोनी म्हापसेकर, शशांक आटक,श्रीकृष्ण कांबळी आदींसह महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक यूनियन, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ,सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ,महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना,जि प. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, क्राष्ट्राईब कर्मचारी महासंघ,शिक्षक भारती सिंधुदुर्ग , महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सिंधुदुर्ग,खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ,महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना, मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ,सिंधुदुर्ग जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनांचे प्रतिनीधी व ३०० ते ३५० कर्मचारी उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी दिल्या जोरदार घोषणा !
कर्मचारी कोणाचा गुलाम नाही … गुलाम नाही..! , कर्मचाऱ्यांना सन्मानाची … वागणूक मिळालीच पाहिजे , हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जाएगा … आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कणकवली प्रांताधिकाऱ्यांचा निषेध असो… निषेध असो…यासह विविध घोषणा देत कर्मचा-यांनी जोरदार निषेध नोंदवला.
यावेळी राजन कोरगावकर म्हणाले, देवगड येथे प्रशिक्षण कार्यक्रमात कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर मार्गदर्शन करत होते. त्यावेळी उशीर झाला होता म्हणून शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांनी त्या ठिकाणी आम्हाला ब्रेक द्या अशी विनंती केली. त्यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी हरामखोर असा उल्लेख केला आहे. त्यांनी बऱ्याच कर्मचाऱ्यांशी, महिला कर्मचाऱ्यांना त्रास दिलेला आहे. त्यामुळे कर्मचा-यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी जिल्हाधिका-यांकडे दिलगीरी व्यक्त केल्याचे माध्यमांमधून आम्हाला समजते. मात्र, आम्हाला त्यांचे कुठलेही पत्र मिळालेले नाही. त्यामुळे जोपर्यंत त्यांचे निलंबन होत नाही , तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान , कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते.तर पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलनकर्त्यांशी जिल्हाधिका-यांनी केली दुरध्वनीवरुन चर्चा !
कणकवली प्रांताधिका-यांच्या विरोधात निषेध आंदोलन समन्वय संघटनांच्यावतीने करण्यात आले. आंदोलन शेवटच्या टप्प्यांत असताना कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून जिल्हाधिका-यांशी दुरध्वनीवरुन संवाद घडवून दिला. यावेळी आंदोलनकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली.