नेपाळ काठमांडू येथे झाली आंतरराष्ट्रीय स्पर्धा ; स्वराज पाताडे याने पटकावले सुवर्णपदक
कणकवली ,दि. ११ जून
तालुक्यातील असलदे गावचा युवा खेळाडू स्वराज संतोष पाताडे याने नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित 17 व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत स्वराज संतोष पाताडे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. अवघ्या 15 व्या वर्षी त्याने स्थानिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपल्या गुणवत्तेची छाप पाडल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही स्पर्धा दि. 3 जून ते 4 जून 2026 दरम्यान पार पडली. स्पर्धेत 50 किलो वजन गटात सहभागी होत, स्वराजने उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याच्या या यशामागे पालकांचे मार्गदर्शन तसेच आंबोली पब्लिक स्कुलचे मार्गदर्शक सोनु जाधव यांचे मोलाचे योगदान आहे. स्वराज यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आला आहे. त्याने विजापूर ( कर्नाटक ) 2025 येथे कांस्यपदक व आंबोली 2026 , ज्युडो स्पर्धा कोल्हापूर 2025येथे कांस्य पदक मिळवले होते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकून त्याने आपल्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
स्वराजच्या या उल्लेखनीय यशामुळे असलदे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या यशामुळे इतर युवक-युवतींनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.