कणकवली ,दि.२२ ऑगस्ट
इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये तळेरे नं. १ शाळेने दैदिप्यमान यश संपादन केले असून, शाळेचे तब्बल नऊ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे यातील दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या शैक्षणिक यशात मानाचा तुरा रोवला आहे.
शाळेतील कु. ज्ञानेश पाटील याने २७४/३०० गुण मिळवत राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळवला. त्याने राज्यात ११ वी रँक , सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसरा आणि कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच कु. ज्ञानदा पाटील हिने २६०/३०० गुण मिळवत सिंधुदुर्ग जिल्हा सर्वसाधारण प्रवर्गात चौथा,आणि कणकवली तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उल्लेखनीय यशामुळे तळेरे नं. १ शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा दखल घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सरावाला, अविरत कष्टांना आणि जिद्दीला योग्य मार्गदर्शन व प्रेरणेची जोड मिळाल्याने हे उज्ज्वल यश संपादन करता आले.
या यशामध्ये वर्गशिक्षिका शोभा पाटील यांचे मोलाचे व सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक महेंद्र पावसकर, सहकारी शिक्षकवृंद यांचे अनमोल सहकार्य मिळाले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवकी तळेकर आणि सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले.