कणकवली : विद्यामंदिर कणकवलीमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

शेअर करा

८५ विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकांसह मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिपायांच्या भूमिका

कणकवली,दि.०९ सप्टेंबर

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली येथे शिक्षक दिन उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या तब्बल ८५ विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षकांची भूमिका स्वीकारत शालेय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या विषय शिक्षकांचे अनुकरण करत प्रभावीपणे अध्यापन करून उपस्थितांची दाद मिळवली.

या उपक्रमात कुमार कबीर पेडणेकर याने मुख्याध्यापकाची, तर अनया जाधव हिने पर्यवेक्षकाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. स्वानंद करंबेळकर व गुरु ठाकूर यांनी लिपिकाची जबाबदारी स्वीकारून शालेय कार्यालयीन कामकाज पूर्ण केले. तसेच पियुष वरक, ऋतुराज जाधव, हिमांशू बेळणेकर, हरेश देवलकर, रुद्र सावंत, मंथन बाचोलकर आणि कृष्णा तेली या विद्यार्थ्यांनी शिपाई म्हणून जबाबदारी सांभाळत शालेय कामकाज सुरळीत पार पाडण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले.

संपूर्ण दिवसाचे शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज विद्यार्थ्यांनीच उत्साहाने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि यशस्वीपणे पार पाडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या भूमिकेचा तसेच शालेय व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

प्राथमिक गट :
प्रथम – परिणीती ठाकूर (भाषा)
द्वितीय – धनुष किर्तने (विज्ञान)
तृतीय – आराध्या कडूलकर (गणित)

माध्यमिक विभाग :
प्रथम – मृणाल पाटील (भाषा)
द्वितीय – देविका राऊळ (विज्ञान)
तृतीय – बुद्धीकेश डांगमोडेकर (गणित)

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे यांनी विद्यार्थी शिक्षकांनी अत्यंत मनापासून तयारी केल्यामुळे त्यांचे अध्यापन प्रभावी झाले, असे सांगितले. शिक्षक म्हणून मिळालेला हा अनुभव विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पर्यवेक्षक अच्युतराव वणवे यांनी विद्यार्थी शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिपाई यांच्या भूमिकेत काम करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि जबाबदारीने संपूर्ण शालेय कामकाज पार पाडल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, विद्यार्थी शिक्षक बुद्धीकेश डांगमोडेकर, वैष्णवी लाड, मृणाल पाटील, देविका राऊळ, स्वराज चव्हाण, अनया जाधव आणि लिनेश कदम यांनी शिक्षक म्हणून काम करताना आलेले गमतीदार तसेच भावनिक अनुभव कथन केले. त्यांच्या अनुभवकथनाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख जनार्दन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या शिरसाट, प्रिया सावंत, वैभवी हरमलकर, सत्यवान कदम, मधुरा मुंडले आणि शर्मिला केळुसकर यांनी केले. सूत्रसंचालन जनार्दन शेळके यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्या शिरसाट यांनी केले.

विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेतून घेतलेला हा अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी तसेच नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरला.

शेअर करा