Kankavli : 58 वर्षापूर्वीची ‘ती’ काळरात्र , अंगावर काटा आणणारी …!!

शेअर करा


कणकवली गडनदीनजीकच्या वळणावर झाला होता भीषण अपघात ; एकाच वेळी अपघातात 54 जणांचा झाला मृत्यू

सिंधुदुर्ग,दि.१० ऑक्टोबर


गेल्या 58 वर्षापूर्वी संपूर्ण कोकणला हादरवणारी दुदैवी घटना सर्वपित्री अमावास्येदिवशी घडली होती. भजनातून समाजाचे प्रबोधन करण्याची प्रथा परंपरा गेल्या अनेक वर्षापासून कोकणात आहे. त्यानुसार 21 सप्टेंबर 1968 रोजी शनिवारी सर्वपित्री अमावास्या होती. या दिवशी कणकवली शहर तसेच परिसरातील 120 भजन प्रेमी मालवण भरड दत्त मंदिर येथील डबलबारी सामन्याला निघाले होते. भजन महर्षी अर्जुन तावड़े बुवा व परशुराम सावंत बुवा यांच्यात डबलबारीचा सामना होता. त्यासाठी कणकवलीतून भजन मंडळींना घेऊन ट्रक मालवणला निघाला…. पण गडनदी नजीकच्या वळणावर या ट्रकला भीषण अपघात झाला. त्यात तब्बल 54 जणांना एकाचवेळी दुदैवी मृत्यू झाल्याने ही काळ रात्र 58 वर्षानंतरही अंगावर काटा आणणारी ठरत आहे.
भजनाची मंडळी जातानाच काळाचा घाला –
सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास कणकवली गडनदीनजीक सुदर्शन मित्रमंडळाची भजन मंडळी घेऊन डबलबारी भजनासाठी जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन् होत्याचे नव्हते झाले. अपघातात तब्बल 54 जणांचा तडफडून मृत्यू झाला, तर त्या अपघातातील 27-28 जण गंभीर जखमीच्या जीवनाला कायमस्वरूपी जखमा ठेवणारा हा भीषण अपघात ठरला. त्या अपघाताची आठवण जरी आली तरी आजही थरकाप उडतो. गडनदी पुलापासून अवघ्या 20 फूट गेल्यानंतर डाव्या बाजूला दरीत ट्रक कोसळला, ट्रकमध्ये हौद्यात 80 ते 90 मंडळी उभी होती. ट्रकच्या कॅरियरबर 10ते 12 जण बसले होते. तर केबीनमध्ये मंडळाचे बुवा अर्जुन तावडे, बाबू आरोलकर, गणपत टिकले ही जाणती मंडळी आत बसली होती, या ट्रकमध्ये सुमारे 120 ते 125 मंडळी प्रवास करत होती. त्यांच्यावर अचानक काळाने घाला घातला. भजन मंडळी घेवून जात असताना ट्रकची बंदिस्थ व्यवस्था असल्याने अपघातानंतर चिरडून अनेकांचा जागीच मृत्यू झाला, 58 वर्षांपूर्वी 54 जणांचा मृत्यू तर 27 ते 28 जण गंभीर जखमी झाले होते. तेळी आळी येथे धावत धावत जाऊन झालेल्या भीषण अपघाताची माहिती प्रकाश हर्णे गुरूजी यांनी दिली. अपघाताची बातमी समजताच तेली आळीतील प्रत्येक घरात दुखा:चा डोंगर पसरला होता.

त्याकाळात डॉ. सीटन ठरले देवदूत –
58 वर्षापूर्वी त्या काळात सिंधुदुर्गात तशी आरोग्य व्यवस्था तोकडीच होती.त्यावेळी वेंगुर्ले येथील सेंट लुक्स हॉस्पिटलचे डॉ. सीटन यांना अपघाताची माहिती देण्यात आली, ते रुग्णवाहिका घेऊन कणकवली येथे पोहोचले. हा अपघात त्या वेळच्या काळात सर्वांत मोठा अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. सीटन यांनी गंभीर रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेत घालून वेंगुर्लेतील हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यांच्यावर उपचार केले. त्याकाळातील त्यांचे उपचार म्हणजे देवदूताप्रमाणेच त्यांची सेवा ठरली आहे. त्यांच्या या आरोग्य सेवेबद्दल कणकवलीकरांच्या मनात आठवणी जागवत आहेत.

Box
त्या काळरात्रीच्या जखमा आजही ओल्याच
कणकवलीतील भजनमंडळींचा तो अपघात म्हणजे भजनी कलाकारांसाठीच एक धक्का होता. आठवणी त्या अजुनी स्मरती मना-मनाच्या कप्प्यात… कणकवलीची अनेक रत्ने विखरूनी गेली…. त्या राती,
सांस्कृतिक नगरीची हानी होवूनही , अनाथ झाली किती बालके… पोरकी बनली अनेकांची घरदारे,
अबोल बनले सारे भजनी सुरांचे ते वारे …अठ्ठावणव्या वर्षी अमर व्यथेचे स्मरण करुया चिरंतर …या शब्दांत या अपघाताला उजाळा देताना त्या काळरात्रीच्या जखमा आजही ओल्याच असल्याचे दिसून येत आहे.

शेअर करा