कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल..
कणकवली ,दि.१९ सप्टेंबर
एसटीतून प्रवास करत असताना महिलेच्या पर्समधील 1 लाख 65 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचा प्रकार नडगिवे येथे घडला. याप्रकरणी मानसी मिलींद आणेराव (31, रा. देवरूख-रत्नागिरी) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानसी आणेराव या बुधवार 16 रोजी देवरूख येथून कुर्ली ब्राम्हणदेववाडी येथील आपल्या माहेरी आल्या होत्या. शनिवार 19 रोजी सकाळी 6.30 वा. च्या सुमारास त्या कुर्ली-फोंडाघाट बसने फोंडाघाट स्थानकापर्यंत आल्या. त्यानंतर 7.45 वा. च्या फोंडाघाट-गडमठ बसने तळेरे येथे आल्या. तळेरे येथून त्या कणकवली-रत्नागिरी बसमध्ये चढल्या. या कालावधीत या प्रवासादरम्यान त्यांच्या पर्समधील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व 3 ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील कुडी असे एकूण 1 लाख 65 हजार किंमतीच्या सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. हा प्रकार त्यांच्या लक्षात आला असता त्यांनी कणकवली पोलिस ठाणे गाठून अज्ञाताविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.