कणकवली :
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या विभागीय केंद्र कोल्हापूर व कणकवली कॉलेज कणकवली अभ्यासकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वा विभागीय युवक महोत्सव-२०२६ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता कणकवली कॉलेजच्या एच.डी.सी.एल. सभागृहात होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीचे चेअरमन मा. डॉ. अनंत नागवेकर राहणार आहेत. उद्घाटक म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्र कोल्हापूरचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. एस.पी. थोरात उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीचे सचिव विजयकुमार वळंजू उपस्थित राहणार आहेत.
या युवक महोत्सवामध्ये विभागीय केंद्रांतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभ्यासकेंद्रांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी सांस्कृतिक समन्वयक प्रा. हरीभाऊ भिसे, केंद्रसंयोजक प्रा. मनोज कांबळे आणि केंद्रप्रमुख प्रा. युवराज म्हाळुंगे यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.