कणकवली : ओसरगाव येथे रस्त्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

शेअर करा

थेट पाण्यात बसून बबली राणे यांचे आंदोलन सुरु; प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी

कणकवली,दि.११ सप्टेंबर

ओसरगाव येथील नालंग घर ते तोरसकर घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी माजी सरपंच बबली राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडले. गेल्या सुमारे ४० वर्षांपासून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी होत असतानाही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या आंदोलनात सखाराम परब, बबली राणे, गोपाळ तोरसकर, शांताराम तोरसकर, स्वप्नील तोरसकर, सुधाकर तोरसकर, सत्यवती परब, अनुसया परब, लता तोरसकर आणि अलका तोरसकर यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याची तातडीने तात्पुरती डागडुजी करण्यात यावी, तसेच पुढील काळात रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येईल, याबाबत लेखी निवेदन अथवा आश्वासन देण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.मात्र, त्याकडे दुलर्क्ष करण्यात आला. त्यामुळे जोपर्यंत गणेशोत्सवासाठी रस्त्याची तात्पुरती डागडुजी होत नाही आणि पुढील खडीकरण-डांबरीकरणाबाबत लेखी आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलनातून उठणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. स्थानिक तसेच तालुका प्रशासनाने घटनास्थळी येऊन ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत प्रशासन घटनास्थळी येत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, वेळ पडल्यास गणपतीची पूजा याच ठिकाणी करु, असा इशारा देत डागडुजी होत नाही , तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.

जोरदार घोषणाबाजी

आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. “कोण म्हणतंय देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय”, “आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्चा खाली करा”, “सरपंचांनी दिलेली आश्वासने पूर्ण करा” अशी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या प्रश्नावर आता केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शेअर करा