काजूची कलमे मोडून लाखो रुपयांचे नुकसान; शेतकरी हवालदिल
कणकवली,दि.२७ सप्टेंबर
असलदे गावात गवारेड्यांनी धुडगूस घातल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गवारेड्यांच्या कळपाने शेतजमिनी तसेच काजू बागायतींमध्ये घुसून काजूची कलमे मोडून टाकल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
असलदे परिसरातील शेतकऱ्यांनी मेहनतीने वाढविलेल्या काजूच्या कलमांचे गवारेड्यांकडून मोठ्या प्रमाणात गेल्या आठ दिवसात नुकसान करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी काजूची झाडे मोडून पडली असून, काही कलमांचे खोड व फांद्या तुटल्याने आगामी काजू उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
काजू हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असून, बागायती तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च आणि अनेक वर्षांची मेहनत घ्यावी लागते. अशा परिस्थितीत तयार झालेली काजूची झाडे गवारेड्यांकडून मोडली जात असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
गवारेड्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नुकसानग्रस्त काजू बागांची पाहणी करून पंचनामे करावेत तसेच शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गवारेड्यांचा बंदोबस्त न झाल्यास भविष्यात काजू बागायतींसह अन्य शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वन विभाग व संबंधित प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीयार्ने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.