पाणी संकट टाळण्यासाठी कणकवली नगरपंचायत प्रशासनाने काम करावे ;नळपाणी योजनांच्या पाण्याच्या टाक्या ओव्हर फ्लो थांबवा..
कणकवली,दि.०१ ऑक्टोंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाला आहे. परिणामी जिल्ह्यात दृष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात कणकवली शहरात पाणी टंचाईचे संकट गंभीर बनत जाणार आहे. कणकवली शहरवासीयांना पाणी टंचाईची झळ बसू नये यासाठी नगरपंचायत प्रशासनाने गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या पाहिजे, अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केली.
नगरपंचायतीच्या नळपाणी योजनांच्या पाण्याच्या टाक्या ओव्हर फ्लो होत असून पाण्याची नासाडी टाळण्यासाठी तत्काळ उपायायोजना करणे गरजेचे आहे. दृष्काळजन्य परिस्थितीत नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य हवे असेल तर ते केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
येथील समीर नलावडे संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. नलावडे बोलत होते. यंदा कमी पाऊस पडल्याने पाणी टंचाईचे संकट निर्माण होणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका कणकवली शहराला बसणार आहे. उन्हाळा तीव्र झाल्यानंतर गडनदी व जानवली नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत घट झाल्यानंतर शिवडाव धरणाचे पाणी सोडले जाते. मात्र, यंदा पाऊस कमी पडल्याने धरणाचे पाणी नदीपात्रांमध्ये सोडले जाण्याबाबत शांशकता आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ नये याकरिता प्रशासनाने पाणथळ भागातील असलेल्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी प्लॅन तयार केला पाहिजे.
नगरपंचायतीने प्रत्येकाला नळ कनेक्शन दिले आहे. नळाद्वारे होणा-या पाण्याचा योग्य वापर होता कि नाही, याचा अभ्यास प्रशासनाने केला पाहिजे. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी प्रशासनाने टीम तयार करून पाण्याच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी ही टीम कार्यरत ठेवली पाहिजे. कमी पावसामुळे शहरावर येणारे पाणी संकट टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या संदर्भात सामाजिक संस्थांसोबत प्रशासनाने बैठका घेतल्या पाहिजेत. तसेच शहरात हॉटेलची संख्या मोठी आहे. हॉटेलवाले पाण्याचा मोठा प्रमाणात वापर करतात. शहरातील पाणी टंचाई संकट लक्षात घेता हॉटेलवाल्यांच्या पाण्याच्या वापरावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कणकवली शहराची लोकसंख्या २५ हजारच्या आपपास आहे. मग एका कुटुंबाला किती लिटर पाणी लागेल? त्याचा अभ्यास करून त्यांना पाण्याची व्यवस्था कशी झाली पाहिजे किंवा त्यांना थोडसे बंधन घालून त्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करा, अशा पद्धतीचे नियोजन झाले पाहिजे. पाणी टंचाईचे संकट लक्षात घेता कणकवली शहरातील जनतेला मी आवाहन करतो की, अतिशय जपून पाणी वापरण्याची गरज आहे. यंदा जिल्ह्यात ४० टक्के पाऊसाची घट झाली आहे. पाणी संकटप्रश्नी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून कणकवली शहरातील संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्वांना एकत्रित आण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत.
महसूलमंत्री, पालकमंत्र्यांचे नलावडे यांनी मानले आभार ..
शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकातील जुन्या भाजी मार्केटकरिता महसूल विभागाची जागा मिळावी, याकरिता सिंधुदुर्ग दौ-यावर आलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मी मागणी केली होती. त्यानुसार जमिन संपादनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. याबद्दल महसूलमंत्री, पालकमंत्री यांचे समीर नलावडे यांनी आभार मागले. जमिन संपादनाचा प्रश्न मी केलेल्या पाठपुरव्यामुळे मार्गी लागल्याचा दावा त्यांनी केला.