माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रतिपादन; पाणी जपून वापरण्याचे आवाहन
कणकवली,दि.२९ सप्टेंबर
कणकवली शहरातील रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे व्यवसाय करत असून, प्रवाशांना विशेषतः रात्री-अपरात्री सुरक्षितपणे प्रवासाची सुविधा देण्याचे काम ते करत आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपण्याचे काम संघटनेने केले आहे, असे प्रतिपादन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.
कणकवली रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने आयोजित गणेशोत्सव कार्यक्रमात समीर नलावडे सपत्नीक सहभागी झाले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी कणकवली नगरपंचायतीच्या विरोधी गटनेत्या सुप्रिया नलावडे, राज नलावडे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, बाळा वराडकर, संतोष सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या वतीने एकांकिकेपासून अभिनेता म्हणून नाटक व चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विवेक वाळके, सुहास वरुणकर, अभय खडपकर आणि संजय मलडकर यांचा समीर नलावडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कलाकारांनी एकांकिकेतून अभिनयाची सुरुवात करून नाटक व चित्रपट क्षेत्रात विविध भूमिका साकारल्या आहेत. कणकवलीकर म्हणून या कलाकारांचा अभिमान असल्याचे नलावडे यांनी सांगितले.
पाणी जपून वापरण्याचे आवाहन
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून कणकवली तालुक्यालाही भविष्यात पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. पाणी अडविणे व पाण्याचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. नागरिकांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारल्यास भविष्यातील पाणी संकटाचा सामना करणे सुलभ होईल, असे आवाहन समीर नलावडे यांनी केले.
आरोग्य तपासणी शिबिराचे कौतुक
रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी शिबिरही समाजाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे नलावडे यांनी सांगितले. आरोग्य सुरक्षित असेल तरच आपण समाजाची प्रभावीपणे सेवा करू शकतो. आरोग्य तपासणीच्या माध्यमातून रिक्षा चालक-मालक संघटनेने समाजासमोर चांगला आदर्श निर्माण केला आहे.
कणकवली रिक्षा चालक-मालक संघटना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर राहिली असून, अशा संघटनेचा कणकवलीकर म्हणून आपल्याला अभिमान असल्याचेही समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.