पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार गतिमान कामाला सुरुवात; वाहनचालकांनी व्यक्त केलं समाधान..
कणकवली,दि.२५ ऑगस्ट
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे.त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
कणकवली शहरातील नगरपंचायत हद्दीतील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते अचरा जाणारा रस्ता, तसेच नगरपंचायत व जिल्हा परिषद हद्दीतील विविध रस्त्यांवरील खड्डे गणेशोत्सवातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन भरण्यात येत आहेत.
विशेषतः कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर रस्ता या मार्गावरील खड्डे रात्रीच्या वेळी वाहतूक बंद असताना बुजविण्यात आले. इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे कामही सध्या सुरू आहे.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक व चाकरमानी कणकवलीत दाखल होणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याच्या या कार्यवाहीमुळे वाहतुकीस होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.