कणकवली,दि.१८ जुलै
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा रविवारी, दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर हे प्रमुख उपस्थिती लावणार आहेत.
सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने युवा संदेश प्रतिष्ठानने हा उपक्रम हाती घेतला असून, विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी हा या कार्यक्रमामागील हेतू आहे.
या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक संदेश उर्फ गोट्या सावंत आणि युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी केले आहे.