कट्टा महाविद्यालयात प्रा. एस . व्ही. वराडकर यांची ९२ वी जयंती उत्साहात संपन्न

शेअर करा

कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्वाचा त्रिवेणी संगम म्हणजे प्रा. शरद विठ्ठल वराडकर

कट्टा, दि. ०५ सप्टेंबर

डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रा. सी. व्ही. वराडकर यांची ९२ वी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

कट्टा येथील मूळ रहिवासी असलेले स्वर्गीय प्रा. शरद विठ्ठल वराडकर यांनी बी.एड., एम.एड.पर्यंत शिक्षण घेतले. नोकरीनिमित्त कोल्हापूर येथे स्थायिक झाल्यानंतरही त्यांचे मन कट्टा येथील विद्यामंदिराशी जोडलेले राहिले. मुंबई सचिवालयातील शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी योगात्मा डॉ. काकासाहेब वराडकर व डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या सोबत शिक्षणदानाचे कार्य स्वीकारले. कट्टा हायस्कूलमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, सचिव व अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. शिक्षणाबरोबरच साहित्य व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

‘क्षितिज’, ‘गुणवंती’, ‘मॉफिनचे बळी’, ‘दोन घडीचा डाव’ आदी साहित्यकृतींतून त्यांनी साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटविला. त्यांच्या ‘अबधारणा’ या आत्मकथनाला १९९४-९५ मध्ये कोकणी-मराठी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला.तसेच आदरणीय डॉ. काकासाहेब वराडकर यांच्या त्यागाचा, समाजकार्याचा, ज्ञानदानाचा आणि कर्तृत्वाचा लेखाजोखा योगात्मा या चरित्र ग्रंथाच्या रूपाने लिहिला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रा. सी. व्ही. वराडकर यांचे सुपुत्र, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. अजयराज वराडकर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आपल्या वडिलांच्या आठवणी सांगताना ते भावूक झाले. विद्यामंदिर उभारणीसाठी आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी वाचनाला जीवनाचा मंत्र मानून ध्येय निश्चित करावे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु. संचिता मंगेश करावडे हिने विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतातून तिने प्रा. शरद विठ्ठल वराडकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्याविषयी आदर व्यक्त केला.

प्राचार्य प्रा. ध्वजेंद्र विठोबा मिराशी यांनी प्रा. सी. व्ही. वराडकर यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेतला. उपप्राचार्य प्रा. आर. जी. गावडे यांनी आभार मानताना आपण या विद्यामंदिराचे माजी विद्यार्थी असून त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एच. आर. नाईक उपस्थित होते.

प्रा. सी. व्ही. वराडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित महाविद्यालयाच्या इतिहास विभागामार्फत निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच वाचन प्रेरणा देणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. के. व्ही. खानोलकर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा