समाजातील गरजूंना योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी संघटना कटिबद्ध; जैन समाजाच्या एकतेचा संदेश
दक्षिण भारत जैन सभा कोकण विभागाचा जनसंपर्क मेळावा देवरुख येथील मराठा भवनमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सभेचे अध्यक्ष भालचंद्रजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास संघटन मंत्री शशिकांत राजोबा, मुख्य महामंत्री अनिल बागणे, चेअरमन संजय शेटे आणि केंद्रीय उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
णमोकार महामंत्र पठण, दीपप्रज्वलन तसेच संस्थापक अण्णासाहेब लठ्ठे आणि प्रथम आचार्य श्री शांतीसागर मुनी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोकण विभागाचे उपाध्यक्ष अजित शिराळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

प्रास्ताविकात मिलिंद मांगले यांनी कोकणातील जैन समाजाचा इतिहास, सध्याची परिस्थिती तसेच समाजासमोरील विविध गरजा आणि आव्हाने यांचा आढावा घेतला. यावेळी विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कृषी आणि उद्योजकता विषयक योजनांची माहिती दिली.
मुख्य महामंत्री अनिल बागणे आणि संघटन मंत्री शशिकांत राजोबा यांनी जैन समाजातील सर्व पंथांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करत प्रत्येक गरजवंत जैन बांधवाच्या पाठीशी दक्षिण भारत जैन सभा ठामपणे उभी असल्याचा विश्वास व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात भालचंद्रजी पाटील यांनी धार्मिक विधींवरील अनावश्यक खर्च कमी करून त्यातील निधी समाजकल्याण आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याची गरज व्यक्त केली. समाजातील गरीब आणि गरजू घटकांना मदत करणे हेच संस्थेचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यास कोकण व गोवा विभागातील जैन समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद मांगले यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. केतकी धने यांनी केले.