कुडाळ आगारातील बंद ठेवण्यात आलेल्या ६७ एसटी बसफेऱ्या अखेर पूर्ववत

शेअर करा

प्रवाशांना मोठा दिलासा

कुडाळ,दि.०९ सप्टेंबर

कुडाळ आगारातून चालणाऱ्या ग्रामीण व प्रवासी हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ६७ एसटी बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या गंभीर प्रश्नासंदर्भात आज दुपारी ठीक ३.०० वाजता कुडाळ आगार व्यवस्थापक यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.


या बैठकीस विद्यमान सभापती मा. मिलिंद नाईक, योगेश घाडी, राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या कुडाळ आगार अध्यक्षा रश्मी नाईक तसेच राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे विभागीय सरचिटणीस रोशन तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीदरम्यान बंद ठेवण्यात आलेल्या ६७ बसफेऱ्यांबाबत आगार व्यवस्थापक यांना जाब विचारण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, कामगार व सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या सर्व फेऱ्या तत्काळ सुरू करण्याची ठाम मागणी करण्यात आली.


या चर्चेची दखल घेऊन संबंधित ६७ बसफेऱ्या तत्काळ पूर्ववत करण्याबाबत आवश्यक आदेश काढण्यात आले असून, आजपासून सर्व फेऱ्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.

शेअर करा