कुडाळ :पिंगुळीत ८० वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र स्प्रे मारून लंपास

शेअर करा

घराचा दरवाजा उघडताच दोघा अज्ञात इसमांची जबरी चोरी; कुडाळ पोलिसांकडून तपास सुरू

कुडाळ,दि.१० सप्टेंबर

पिंगुळी सराफदारवाडी येथे घरात एकट्या असलेल्या ८० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दोन अज्ञात इसमांनी जबरीने हिसकावून नेल्याची घटना बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे ४० हजार रुपये किमतीचे २४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, कुडाळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

याबाबत शोभा महादेव ताम्हणकर (वय ८०, रा. पिंगुळी सराफदारवाडी, ता. कुडाळ) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३०७/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२), ३०९(६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे ८.१५ वाजता शोभा ताम्हणकर या आपल्या घरी असताना दोन अनोळखी इसम त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ आले. त्यातील एका इसमाने दरवाजावर थाप मारल्याने ताम्हणकर यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच संबंधित इसमाने त्यांच्या उजव्या हाताने गळ्याला पकडले, तर दुसऱ्या हाताने कोणताही स्प्रे त्यांच्या चेहऱ्यावर व डोळ्यांवर मारला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ताम्हणकर यांना काही कळण्याच्या आतच आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून घेतले. त्यानंतर दोन्ही अज्ञात इसम घराच्या कंपाउंड गेटच्या दिशेने पळून गेले. या मंगळसूत्रामध्ये सोन्याचे मणी व काळे मणी असलेली एक पदरी डवली असून, त्याचे वजन २४ ग्रॅम आहे. त्याची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर ताम्हणकर यांनी कुडाळ पोलिसांना माहिती दिली. रात्री ११.४७ वाजता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही ASI/८८५ कोळंबकर यांनी केली.

घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास सपोनी पाटील करीत आहेत. दोन्ही अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, परिसरातील माहिती तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शेअर करा