कुडाळ : विहिरीत पडून ८१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

शेअर करा

वेताळबांबर्डे येथील घटना

कुडाळ,दि. १८ ऑगस्ट

वेताळबांबर्डे-भोगलेवाडी येथे विहिरीत पडून ८१ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवारी) सकाळी घडली. रमेश गोविंद भोगले (वय ८१, रा. वेताळबांबर्डे, भोगलेवाडी) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रमेश भोगले हे नेहमीप्रमाणे आज सकाळी पूजेसाठी आवश्यक असलेले पाणी आणण्यासाठी घराजवळील विहिरीकडे गेले होते. विहिरीतून पाणी काढत असताना त्यांचा अचानक तोल गेल्याने ते आत पडले. विहिरीत पाणी असल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी सुमारे ८.३० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान ही घडली.


दरम्यान, बराच वेळ उलटूनही वडील घरी परत न आल्याने मुलगा गोविंद भोगले यांनी त्यांचा शोध सुरू केला. विहिरीजवळ त्यांची काठी आढळून आल्याने मुलाला संशय आला. त्यानंतर विहिरीत पाहणी केली असता रमेश भोगले यांचा मृतदेह आढळून आला.


या घटनेची माहिती कुडाळ पोलिसांना देण्यात आली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणी मुलगा गोविंद रमेश भोगले यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


या घटनेचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल परुळेकर करीत आहेत. वृद्धाचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने वेताळ बांबर्डे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा