कुडाळ : पालकमंत्री नितेश राणे यांचे बॅडमिंटन असोसिएशनकडून मानले आभार

शेअर करा

जिल्हा क्रीडा संकुलातील सहा बॅडमिंटन कोर्ट पूर्ण...

कुडाळ,दि.१५ जुलै

सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुल येथे सहा अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्टांची निर्मिती पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनने पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भातील आभारपत्र असोसिएशनच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आले.

असोसिएशनने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे, सकारात्मक सहकार्यामुळे आणि क्रीडा विकासासाठीच्या बांधिलकीमुळे जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूंना आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध झाली आहे.

या नव्या सुविधेमुळे खेळाडूंना नियमित सराव, दर्जेदार प्रशिक्षण तसेच जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी अधिक सक्षमपणे तयारी करता येणार असून, सिंधुदुर्गातील बॅडमिंटनच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल असोसिएशनने कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यातही असेच मार्गदर्शन व सहकार्य लाभेल, अशी अपेक्षाही पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

शेअर करा