कुडाळ,दि.१० ऑगस्ट
सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी वेंगुर्ला आगाराचे भरत चव्हाण यांची निवड झाल्याने सेवाशक्ती संघर्ष समितीच्या वतीने भरत चव्हाण यांचा भव्य सत्कार कुडाळ वेताळ बांबर्डे तेली समाज हॉल येथे करण्यात आला. त्या निमित्ताने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर, उपाध्यक्ष बाळू देसाई, कुडाळ आगार अध्यक्ष जयेश चिंचळकर, केंद्रीय कार्यकारणी कोषाध्यक्ष रामचंद्र मुंडे, पुणे प्रदेशाध्यक्ष अमोल तांबेकर, कोल्हापूर मीडिया प्रमुख कमलाकर अत्राम, आजरा आगार सहसचिव रोहित गबाले, भाजपा कामगार मोर्चा संयोजक व संघटनेचे सल्लागार अशोक राणे, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गावंढळकर, माजी जि. प. सदस्य भारती चव्हाण, भाजपा कार्यकर्ते शैलेश जामदार आदी उपस्थित होते. भरत चव्हाण यांची पत्नी, आई-वडील व मुले या सत्कार समारंभ उपस्थित होती.
यावेळी बोलताना गोट्या सावंत म्हणाले की, आपण मनुष्य आहोत १०० टक्के कधी बरोबर आहे असे म्हणता येणार नाही. कुठे ना कुठे कमतरताही राहणारच आहे. त्यामुळे जेवढे शक्य असेल तेवढे काम आम्ही कामगारांसाठी करणार आहोत व यापूर्वी केलेली आहेत. सध्या राज्यात देशात आपली सत्ता आहे. त्यामुळे आपल्या संघटनेने मांडलेले कर्मचाऱ्यांचे प्रश्न निश्चित सुटणार आहेत. कर्मचाऱ्यांनी चांगले काम करा जिथे तुम्हाला त्रास होईल तिथे आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभे राहू असे सांगितले. आपल्या पाठीशी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, तसेच आमदार निलेश राणे नेहमीच असतात असेही ते म्हणाले. भरत चव्हाण याला मिळालेले पद हे कोणत्याही शिफारशीने मिळाले नसून त्यांनी गेली काही वर्षे संघटना वाढीसाठी दिलेले योगदान असून त्याचे फळ त्याला मिळालेले आहे. भरत चव्हाण याला केंद्रीय कार्यकारणीवर घेतल्याने संघटनेचे संस्थापक व आमदार गोपीचंद पडळकर यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
सिंधुदुर्ग विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी चालक चालवत असलेल्या एसटीची अवस्था किती वाईट आहे असे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने खरेदी केलेल्या लालपरी, जिजाऊ बसेस पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग विभागाला मिळाल्याने एसटी चालक वाहकांना थोडाफार दिलासा मिळाला असल्याचे सांगितले. तसेच सीएनजी बसेस मुळे वेळापत्रक कोलमडत असल्याचे सांगत केंद्रीय कार्यकारिणीने यासाठी उपाययोजना कराव्यात असे सुचविले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसा,ई सल्लागार अशोक राणे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी केंद्रीय कोषाध्यक्ष रामचंद्र मुंडे यांनी संघटनेच्या वाटचाली संदर्भात आपल्या प्रस्ताविकात माहिती दिली.
या सत्कार समारंभाला उत्तर देताना नवनिर्वाचित महाराष्ट्र उपाध्यक्ष भरत चव्हाण म्हणाले की, मला जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारांनी वेळोवेळी साथ दिली. त्यामुळेच मी जिल्ह्यातील सर्व आगारात संघटना वाढवू शकलो. सिंधुदुर्ग विभागात कर्मचाऱ्यांसाठी चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे त्याच्यात सुधारणा व्हावी असे वाटत होते. एसटीचे निवृत्त कर्मचारी आणि सल्लागार अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कर्मचाऱ्यांच्या अडचणी मार्गी लागल्या. सर्वच आगारात आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला तो आज समोर बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दिसत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुडाळ आगारातील प्रशांत गावडेव दिनेश शिरवलकर यांच्या टीमने फार मोठी मेहनत घेतली.
या संवाद कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय कार्यकारी सदस्य स्वप्निल रजपूत, महादेव भगत, प्रशांत गावडे, मनोज कुमार पवार, शैलेंद्र परब, बाबली तुळसकर, विभागीय कार्यशाळेचे अविनाश रणसिंग, अरुण पिळणकर, देवगड आगाराचे अध्यक्ष प्रथमेश घाडी, सचिव साई ओटवकर, विभागीय कार्यालय अध्यक्ष पप्या गावडे, सचिव पंकज कासार, कणकवली सचिव वैभव घोणे, विजयदुर्ग अध्यक्ष पप्प्या मिठबावकर, सचिव रोहन शिंदे, सावंतवाडी अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, सचिव आबा माणगावकर, वेंगुर्ला सचिव दाजी तळवणेकर तसेच जिल्ह्यातील आगारातील चालक, वाहक, यांत्रिक तसेच प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.