युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वात उघडणार अनोखे “पेपर विक्री केंद्र”
कुडाळ,दि.२८ जून
राज्यात आणि देशात सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे रात्रं-दिवस अभ्यास करणाऱ्या लाखो गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य सध्याच्या सरकारने अंधारात ढकलले आहे. परीक्षा यंत्रणेचा हाच ढिसाळपणा आणि राज्यकर्त्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वात बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी कुडाळच्या ऐतिहासिक आठवडे बाजारात (सकाळी ११ वाजता कुडाळ एसटी स्टँड नजीक) एक अत्यंत अनोखे आणि आक्रमक उपरोधात्मक ‘पेपर विक्री केंद्र’ आंदोलन छेडण्यात येणार आहे
गेल्या काही काळातील परीक्षांचा गोंधळ पाहता, आता शिक्षण आणि पदव्या बाजारात विकल्या जात आहेत, अशीच भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. याच वास्तवाचा जाहीर निषेध करण्यासाठी कुडाळ शहरात भरणारे बुधवार बाजाराचे औचित्य साधून युवासेना रस्त्यावर उतरणार आहे.
कसे असेल आंदोलन?
युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनात हुबेहूब बाजारातील भाजी किंवा कपड्यांच्या स्टॉलप्रमाणे एक ‘भ्रष्ट परीक्षा महामंडळ अधिकृत पेपर विक्री केंद्र’ उभारले जाईल. या स्टॉलवरून लाऊडस्पीकरद्वारे फेरीवाल्यांच्या स्टाईलमध्ये उपरोधात्मक घोषणाबाजी करत डमी प्रश्नपत्रिकांची विक्री केली जाईल. “अभ्यास करण्याची गरज नाही, पैसे आणा आणि थेट अधिकारी व्हा!” असा टोला लगावत नीट, एमपीएससी आणि इतर सरकारी भरतीचे पेपर कोट्यवधी रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहेत, असे प्रतिकात्मक दृश्य उभे करून सरकारचा तीव्र निषेध केला जाईल.
प्रमुख मागण्या
: राज्यातील आणि देशातील सर्व पेपर फुटी प्रकरणांची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे
विद्यार्थ्यांचे भवितव्य विकणाऱ्या दलाल आणि दोषी अधिकाऱ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई व्हावी.
प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत युवासेनेचा हा संघर्ष थांबणार नाही. या आंदोलनात युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि कुडाळ तालुक्यातील सर्वसामान्य विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.