मृतदेह कुजलेल्या अवस्थेत, पोलीस तपास सुरू
कुडाळ,दि.११ ऑक्टोबर
पिंगुळी- गुढीपूर येथील एका घरात भाड्याने राहत असलेले पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त लिपीक विजय सोनू कळंबटे (६४, मूळ रा. हातखांबा – रत्नागिरी ) शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्या घरात मृतावस्थेत आढळले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून तीन ते चार दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
विजय कळंबटे हे आंबडपाल येथील पाटबंधारे विभागात लिपीक म्हणून पूर्वी नोकरीला होते. पिंगुळी-गुढीपूर येथील एका घरात ते व त्यांचे कुटुंब गेली बरीच वर्षे भाड्याने वास्तव्याला आहे. त्यांचे दोन मुलगे बाहेरगावी नोकरीला असतात. पत्नी त्यातील एका मुलाकडे राहायला गेली होती. त्यामुळे ते सध्या एकटेच घरी राहायचे. शनिवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास तेथीलच एक महिला फुले काढण्यासाठी त्या घराच्या परिसरात गेली असता, तिला सदर घराचा दरवाजा बंद दिसला. घरातून दुर्गंधी येत होती. तिने आवाज दिला तर तिला प्रतिसादही मिळाला नाही. त्यानंतर तिने तेथील ग्रामस्थांना याची कल्पना दिली. कुडाळ पोलिसांना माहिती देण्यात आली त्यानंतर कुडाळचे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गुरुदास पाडावे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ममता जाधव, संदीप वराडकर घटनास्थळी दाखल झाले. ही घटना समजताच शेजारच्या ग्रामस्थानी तेथे धाव घेतली. पोलिसांनी त्या घराचा दरवाजा उघडून आत पाहिले असता, त्या घरात भाड्याने राहत असलेल्या वृद्धाचा मृतदेह उपडी अवस्थेत निदर्शनाला आला. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू केली आहे. तेथील ग्रामस्थ व होमगार्ड संदेश गंगावणे तसेच आनंद ठाकूर, प्रसन्ना गंगावणे व अन्य ग्रामस्थ पोलिसांना सहकार्य करीत आहेत. पुढील तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.