कुडाळ: भोंदूबाबांसह विनायक राऊत, कुटुंबीयांवर कारवाईची मागणी

शेअर करा

शिवसेना महिला सेनेचे कुडाळात निदर्शने; घोषणाबाजी करत निषेध

कुडाळ,दि.१५ जुलै

माजी खासदार विनायक राऊत, त्यांच्या कुटुंबीयांसह संबंधित भोंदू बाबांविरोधात तत्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना महिला सेना, यांच्या वतीने कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. यानंतर महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस कार्यालयासमोर निदर्शने करत घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.
शिवसेना महिला सेना जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी सुशांत पडते यांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे कुटुंबीय तसेच संबंधित भोंदू बाबांविरोधात त्यांची सून गिरीजा राऊत यांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींमध्ये मानसिक व शारीरिक छळ तसेच महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या बाबींचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
स्त्री सन्मान, सुरक्षितता आणि न्याय या मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल व तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच संबंधित भोंदूबाबांकडून अंधश्रद्धा पसरवून महिलांचा गैरफायदा घेतला जात असल्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्याविरोधातही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन दिल्यानंतर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना महायुती कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत विनायक राऊत व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात निषेध व्यक्त केला. पीडितेला न्याय मिळावा आणि या प्रकरणात दोषींवर तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. यावेळी महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, संग्राम साळस्कर, देवेंद्र नाईक, अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, राकेश नेमळेकर, श्रुती वरदम, रश्मी नाईक, वर्षा संभाजी, प्रज्ञा साळगावकर, रेवती राणे, चेतन पडते, मंदार पडवळ, सागर वालावलकर, सुनीता धुरी, मधुरा धुरी , रंजना बांबुळकर, मधुरा तुळसकर, जानवी कदम, तसेच शिवसेना महिला सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा