कुडाळ विकास आराखडा: मुदतवाढ मिळणे कायदेशीररित्या अशक्य

शेअर करा

हरकती नोंदवण्यासाठी आज शेवटचा दिवस

कुडाळ, दि. ०८ जुलै

कुडाळ शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर सूचना आणि हरकती सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्याची कुडाळ नगरपंचायतीची मागणी नगररचना विभागाने कायदेशीर कारणास्तव फेटाळून लावली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मधील तरतुदींनुसार या कालावधीत वाढ करणे शक्य नसल्याचे नगर रचना विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांकडे हरकती नोंदवण्यासाठी आज, बुधवार दिनांक ८ जुलै २०२६ हा अंतिम दिवस असणार आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेत सर्व नगरसेवकांनी एकमताने ठराव मंजूर करून नगररचना विभागाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. यासंदर्भात कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांनी ६ जुलै २०२६ रोजी पत्रव्यवहारही केला होता.
तथापि, नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग, सिंधुदुर्ग शाखेचे सहाय्यक संचालक व नियुक्त अधिकारी श्री. रवींद्र बनसोड यांनी काल ७ जुलै २०२६ रोजी पत्र जारी करत ही मागणी मान्य करता येत नसल्याचे कळवले आहे. ९ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र शासन राजपत्राच्या (Gazette) प्रसिद्धीच्या दिनांकानुसार, ३० दिवसांची वैधानिक मुदत आज ८ जुलै २०२६ रोजी संपुष्टात येत आहे. अधिनियमातील तरतुदींनुसार हा वैधानिक कालावधी वाढवण्याची कोणतीही तरतूद कायद्यात उपलब्ध नाही.
दरम्यान, ज्या नागरिकांना विहित मुदतीत संपूर्ण कागदपत्रे जोडणे शक्य होणार नाही, त्यांनी उद्यापर्यंत आपली हरकत नोंदवून, त्यासोबतची पूरक कागदपत्रे नंतर होणाऱ्या सुनावणीदरम्यान सादर केल्यास या कार्यालयाची हरकत असणार नाही, असेही नगर रचना विभागाने स्पष्ट केले आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कुडाळच्या नगरसेविका संध्या प्रसाद तेरसे यांनी कुडाळ शहरवासीयांना जाहीर आवाहन केले आहे. “नगरपंचायतीच्या विशेष सभेतील ठरावानुसार मुदतवाढीसाठी प्रयत्न करण्यात आले होते, परंतु नगर रचना विभागाने ती कायदेशीरदृष्ट्या अमान्य केली आहे. त्यामुळे कुडाळमधील नागरिकांनी आता कोणत्याही मुदतवाढीची वाट न पाहता, आपल्या काही हरकती किंवा सूचना असल्यास उद्या, दि. ८ जुलै रोजीच नगरपंचायत कार्यालयात जाऊन त्याची नोंद करावी,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
शहराच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने हा आराखडा अत्यंत महत्त्वाचा असल्याने, नागरिकांनी आज कार्यालयीन वेळेत आपल्या हरकती नोंदवणे आवश्यक आहे.

शेअर करा