कुडाळ : देवळी समाजाचा धार्मिक, गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा दिमाखात संपन्न

शेअर करा

कुडाळ,दि. १८ ऑगस्ट

समस्त देवळी समाजाचा धार्मिक सोहळा, गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा दिमाखात पार पडला. विशेष म्हणजे महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित “मावळतीचा सूर्यकिरण” नाटकाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
    समस्त वालावल, हुमरमळा देवळी समाजातर्फे रविवार वालावल येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर येथे आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाले.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजेने झाली. यावेळी परिसरातील शेकडो भाविकांनी महापूजेत सहभाग घेतला. दुपारी श्री देव लक्ष्मीनारायणाची महाआरती करण्यात आली. या सोहळ्याला जिल्हा देवळी समाज कार्यकारणी मंडळाचे अध्यक्ष राजन नाईक, सचिव विष्णू चौकेकर, खजिनदार रमेश नर्सुले, शिवसेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर आणि गावातील वरिष्ठ व्यक्तिमत्व घनश्याम वालावलकर, युवा उद्योजक संतोष वालावलकर, प्रसन्न वालावलकर यांच्यासह समाज बांधव ग्रामस्थ विद्यार्थी आदी उपस्थित होते.  समाजातील इयत्ता १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला. यामध्ये अथर्व मठकर ९४ टक्के, सोनल मठकर ८३.२० टक्के, आस्था वालावलकर ८३ टक्के, जागृती  मठकर ७५.२० टक्के, मोहन  वालावलकर ७३.२० टक्के या गुणवंतांचा समावेश होता. त्यानंतर  भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेला संयुक्त प्रणालीयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग “मावळतीचा सूर्यकिरण” सादर करण्यात आला. महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित या नाटकाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. साईनाथ नेरुरकर लिखित आणि समीर मठकर संकल्पित या नाटकाचे दिग्दर्शन चेदवणकर गोरे पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांनी केले होते. संजय वालावलकर यांनी साकारलेला द्रोणाचार्य, नारायण आशयेकर यांचा कर्ण, अर्जुन रेडकरचा दुर्योधन आणि कृष्णा परब यांची द्रौपदी या भूमिकांना विशेष दाद मिळाली. महेंद्र कुडव, विलास खानोलकर, तुषार बांदेकर, पांडू तांडेल, बंटी कांबळी आदी स्थानिक कलाकारांच्या अभिनयाने नाटकाला जिवंतपणा मिळाला.
नाट्यप्रयोग पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त देवळी समाज कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. चेदवणकर गोरे नाट्यमंडळाचे संचालक सुधाकर दळवी यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन देवळी समाजाच्या वतीने संतोष वालावलकर यांनी केले.

शेअर करा