गणेशघाटांवर पोलिसांचा बंदोबस्त
मगरीच्या वावरामुळे वनविभागाचे स्वतंत्र पथक तैनात
ग्रामीण भागात शेतात पाणीटंचाईचे सावट
कुडाळ,दि.२४ सप्टेंबर
कुडाळ तालुक्यात ११ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातील विविध गणेश मंडळे आणि घरगुती गणेशभक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात तसेच ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. यंदा अनंत चतुर्दशी बाराव्या दिवशी येत असली तरी अनेक गणेशभक्तांनी अकराव्या दिवशीच विसर्जन करण्याला प्राधान्य दिल्याने गणेश घाटांसह शहरातील विविध विसर्जनस्थळी मोठी गर्दी आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
गणेशघाटांवर पोलिसांचा बंदोबस्त
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील विविध ठिकाणी तसेच प्रमुख गणेशघाटांवर कुडाळ पोलीस प्रशासनाकडून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी, मिरवणुका आणि नदीपात्रातील सुरक्षितता लक्षात घेऊन पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली. विसर्जनाच्या वेळी नदीपात्रात भाविकांची गर्दी होऊ नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले. त्यामुळे शहरातील गणेश विसर्जनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात शांततेत पार पडला.
मगरीच्या वावरामुळे वनविभागही सज्ज
कुडाळ शहरातील भंगसाळ नदीपात्रात मगरीचा वावर असल्याच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्या वेळी भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. यासाठी वनविभागाने कुडाळ शहरातील गणेश घाट तसेच मगरीचा वावर असलेल्या इतर भागात वनकर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक कार्यरत ठेवले होते. गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक नदीकाठी येत असल्याने वनविभागाच्या पथकाकडून भाविकांना नदीपात्रात सुरक्षित अंतर राखण्याबाबत सूचना करण्यात आल्या. विसर्जनाच्या ठिकाणी वनकर्मचाऱ्यांची उपस्थिती असल्याने भाविकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.