राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाचा संयुक्त उपक्रम; प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.
कुडाळ,दि.११ जुलै
संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये नुकतेच राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथील रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
या शिबिरात एकूण ८० रक्तदाते सहभागी झाले होते. यापैकी वैद्यकीय तपासणीनंतर ३७ पात्र विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि प्राध्यापक रक्तदात्यांनी यशस्वीपणे रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
अशा उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होत असते विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होण्यास हातभार लागत असतो.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.एस.एस. एन.आणि एन.सी.सी.विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. भावेश चव्हाण, प्रा. सबा शहा आणि प्रा. प्रणव तेंडोलकर, एन.सी.सी. विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. एस.टी आवटे, एन. एस. एस. विभागाचे स्वयंसेवक आणि वैद्यकीय पथकाचे जनसंपर्क अधिकारी नितीन तुरनर यांनी विशेष परिश्रम घेतले.
