कुडाळ : सिंधुदुर्गात ई-पिक पाहणी नोंद रखडल्याने शेतकरी अडचणीत

शेअर करा

माजी वैभव नाईक यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; महसूल सहाय्यक यांच्यामार्फत नोंद करताना आहेत अडचणी

कुडाळ,दि.०९ सप्टेंबर

महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची ई-पिक पाहणी करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अद्याप ई-पिक पाहणीची नोंद होत नाही.महसूल सहाय्यक यांच्यामार्फत नोंद करताना अडचणी येत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येणार आहेत. याबाबत माजी आमदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभव विजय नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ई-पिक पाहणीची नोंद वेळेत न झाल्यास शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज, शासकीय नुकसानभरपाई, उत्पन्न दाखले, जमीन खरेदी-विक्री प्रक्रिया तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी ई-पिक पाहणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.

गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून, या काळात शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या गावाकडे येतात. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या किमान चार दिवस आधी ‘पीक पाहणी सहाय्यक’ यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ई-पिक पाहणी करून त्याची सातबारा उताऱ्यावर तात्काळ नोंद करण्यात यावी, अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे.

तसेच, मोबाईल ॲपच्या माध्यमातून ई-पिक पाहणी करण्याचा अधिकार भूमिधारक शेतकऱ्यांना देण्यात यावा.ई-पिक पाहणीच्या नोंदी वेळेत पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना भविष्यातील शासकीय प्रक्रिया व योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे, प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

शेअर करा