कुडाळमध्ये घराच्या माडीवरील खोलीला आग; भाडेकरू कुटुंबाचे साहित्य जळून खाक

शेअर करा

केळबाईवाडी नजिक वाघसावंत टेंब येथे घटना; कपडे, धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह जीवनावश्यक साहित्य आगीत भस्मसात, मोठ्या नुकसानीचा अंदाज

कुडाळ,दि. ११ जून
कुडाळ शहरातील केळबाईवाडी नजिकच्या वाघसावंत टेंब येथील श्री भवानी मंदिरासमोरील सामंत यांच्या घराच्या माडीवरील खोलीला अचानक आग लागून खोलीसह भाडेकरू नाईक कुटुंबाचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. कपडे, धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह जीवनावश्यक साहित्य आगीत खाक झाले असून मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
आगीची माहिती मिळताच नागरिकांनी कुडाळ नगरपंचायत व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पाचारण केल्या. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली. खोलीतील गॅस सिलिंडर वेळेत बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत लगतच्या खोलीलाही झळ बसली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला.

शेअर करा