कामगार सामाजिक सुरक्षा सहिंता २०२० नुसार मंडळाकडील ४ योजनांच्या लाभ रक्कमेत भरीव वाढ; कामगार नेते प्रसाद गावडे यांची माहिती
कुडाळ,दि.१४ जुलै
शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणी जीवित असलेल्या सक्रिय बांधकाम कामगारांना केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा संहितेमधील तरतुदीनुसार सुधारित योजनांना शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये प्रसूती सहाय्य योजना, शैक्षणिक सहाय्य योजना, निवृत्ती वेतन योजना आणी मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजनेत नवीन सुधारित तरतुदी लागू केल्या असून कामगारांना दिल्या जाणाऱ्या योजनांच्या लाभ रक्कमेत भरघोस वाढ करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात या संदर्भातल्या सुधारणांना मंजुरी दिलेली असून तात्काळ अंमलबजावणी करण्याचे शासन निर्णयाद्वारे मंडळाला आदेश पारित केले आहेत. त्यानुसार, यापूर्वी मंडळाकडून बंद करण्यात आलेली प्रसूती सहाय्य योजनाकामगारांसाठी पुन्हा कार्यान्वित झालेली असून नैसर्गिक किंवा सीझरद्वारे प्रसूती झाल्यास २५ हजार आर्थिक सहाय्य मिळणार आहे. शैक्षणिक सहाय्य योजने अंतर्गत कामगारांच्या पाल्यांना नववी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी २० हजार, अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर २५ हजार, वैद्यकीय पदवीकरिता प्रति वर्ष १ लाख, इंजीनियरिंग पदवीसाठी प्रति वर्ष ६० हजार, निवासी सैनिक शाळांमधील शिक्षणाकारिता दरवर्षी मिळणार अभ्यासक्रम शुल्काची प्रतिपूर्ती, परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी करणाऱ्या कामगारांच्या पाल्यांना विद्यापीठ अभ्यासक्रम शुल्क लाभ, १ ली आठवी शिक्षण घेणाऱ्या कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना मूलभूत वस्तू संच सहाय्य योजना लागू करण्यात आलेली आहे. निवृत्ती वेतन योजनेंतर्गत वयाच्या साठ वर्षांनंतर दरवर्षी ६ ते १२ हजार, मृत्यू सहाय्य योजनेनुसार कामगारांच्या नैसर्गिक मृत्यूसाठी तीन लाख पन्नास हजार सहाय्य, अपघाती मृत्यूसाठी सहा लाख पन्नास हजार आणी दिव्यांग सहाय्य योजनेअंतर्गत कामगाराला ७५ टक्के अपगंत्व आल्यास २ लाख आर्थिक साहाय्य योजनेस राज्य सरकाडून पावसाळी अधिवेशनात मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कामगारांसाठीच्या कल्याणकारी योजनांमध्ये सुधारणा केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पवार आणी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे समस्त कामगारांच्या वतीने आभार व्यक्त करत असून यामुळे जिल्ह्यातील हजारो कामगारांना थेट लाभ मिळणार असून अधिक माहितीसाठी संघटनेच्या सेवा कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन प्रसाद गावडे यांनी केले आहे.