कुडाळ,दि.११ जुलै
सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघ, शाखा कुडाळ यांच्या वतीने शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी, पणदूरतिठा येथे इयत्ता १० वीच्या परीक्षेत ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व व्यवसाय मार्गदर्शन शुक्रवार १० जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आपा गावडे होते, प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल अजय राजशेखर, सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू तामाणेकर, कुडाळ तालुका अध्यक्ष शामसुंदर सावंत, फेडरेशन अध्यक्ष पी. टी. परब, संस्थेचे संचालक एम. एस. पाटील तसेच शाळेचे मुख्याध्यापक एम. जी. कर्पे उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त सैनिक संघाचे पदाधिकारी सचिव बाळकृष्ण चव्हाण, प्रभाकर पवार, सुभाष शिर्के, सुनील सुर्वे, विठोबा सावंत, प्रसाद लोट, प्रमोद जाधव, मारुती गावडे, अनिल नाईक, संजू पवार, सुमन परब, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी इयत्ता १० वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना परिश्रम, शिस्त, देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि उत्कृष्ट नागरिकत्वाची जाणीव जोपासत जीवनात उच्च ध्येय गाठण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत प्रेरणादायी व उत्साहवर्धक होते. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांना भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा गुणगौरव समारंभ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.