कुडाळ,दि.२४ ऑगस्ट
कुडाळ एमआयडीसी परिसरातील एका पीठ गिरणीसमोरील शेडमध्ये ठेवलेली निळ्या रंगाची जुपिटर दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीटर अँनानियो शेराव (रा. माठेवाठा, कुडाळ) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी रात्री कुडाळ एमआयडीसी परिसरात ही चोरी घडली.
फिर्यादी शेराव यांनी आपली निळ्या रंगाची जुपिटर दुचाकी कुडाळ एमआयडीसीतील एका पीठ गिरणीसमोरील शेडमध्ये ठेवली होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने संधी साधून शेडमध्ये प्रवेश करत ही दुचाकी चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सकाळी दुचाकी जागेवर नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादीने परिसरात शोध घेतला. मात्र दुचाकीचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळी वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीस गेलेल्या दुचाकीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच संशयित व्यक्तींची माहिती तपासली जात असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास पोलीस भोई करीत आहेत.