कुडाळ,दि.१२ ऑक्टोबर
“बाह्य दुष्परिणाम विरहित चिरनिरंतर शारीरिक आरोग्यासाठी फिजिओथेरपी उपचार पद्धती ही अतिशय उपयुक्त उपचार पद्धती आहे. कार्यालयीन कामकाजाच्या बैठ्या कार्यशैलीमुळे उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधींवर दुष्परिणामयुक्त या उपचार पद्धतीद्वारे सहज मात करता येते. यासाठी वेळोवेळी या उपचार पद्धतीचा सर्व कार्यालयीन कर्मचारी व संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळ न्यायालयाचे न्यायाधीश तथा अध्यक्ष, तालुका सेवा समिती कुडाळ जी. ए. कुलकर्णी यांनी केले. बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय कुडाळ, तालुका विधी सेवा समिती कुडाळ व तालुका बार असोसिएशन कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालयाच्या आवारात न्यायाधीश, विधीज्ञ, व कर्मचारी यांच्यासाठी फिजिओथेरपी व उपचार पद्धती या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या फिजिओथेरपी आरोग्य तपासणी शिबिरामध्ये अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतांमध्ये ” या शिबिरामध्ये डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचा आपण अवलंबून करून आपले आरोग्य चांगले राखुया, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी त्यांच्यासोबत कुडाळ न्यायालयाच्या सहदिवाणी न्यायाधीश एन. ए. बकरे, कुडाळ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष जी. टी. पडते, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल व त्यांचे सहकारी डॉक्टर तसेच ॲड. सुहास सावंत, ॲड. नीलांगी रांगणेकर, ॲड. विवेक मांडकुलकर, ॲड. सुनील लोट, ॲड. जे. एस. सामंत, ॲड. डी. एस. सामंत, ॲड. बी. पी. परब, ॲड. एस. एस. कुलकर्णी, ॲड. डी. आर. बिले तसेच न्यायालयातील अन्यविधीज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.
सहदिवाणी न्यायाधीश एन. ए. बकरे यांनी सुद्धा “न्यायालीन कार्यशैलीचा, बैठक व्यवस्थेचा विचार करता व्याधीमुक्त जीवनासाठी फिजिओथेरपी उपचार पद्धतीचे मार्गदर्शन दैनंदिन जीवनात नक्कीच आपल्याला लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला व बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या उपक्रमाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
फिजिओथेरपी उपचार पद्धतीची माहिती देताना बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल यांनी “न्यायालयीन कामकाजाचे स्वरूप, दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करणे, सतत संगणकाचा वापर करणे अशा बैठ्या जीवनशैलीमुळे मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी आणि इतर स्नायू व सांध्यांशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. या समस्या कमी करण्यासाठी, शारीरिक कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि भविष्यातील शारीरिक व्याधी टाळण्यासाठी फिजिओथेरपी ही प्रभावी उपचारपद्धती ठरू शकते, असे प्रतिपादन केले.
आपल्या पुढील मनोगतामध्ये डॉ. बिस्वाल यांनी असे नमुद केले की, न्यायालयीन व कार्यालयीन कामकाजात अनेकदा सलग कित्येक तास बसून राहावे लागते. त्यामुळे शरीराची चुकीची ठेवण, स्नायूंवर येणारा ताण आणि हालचालींचा अभाव यांमुळे विविध शारीरिक तक्रारी उद्भवू शकतात. अशा समस्या टाळण्यासाठी कामाच्या दरम्यान नियमित अंतराने विश्रांती घेणे, थोडे चालणे, योग्य बैठक पद्धतीचा अवलंब करणे, कामाच्या जागेची रचना शरीराला अनुकूल ठेवणे आणि दैनंदिन जीवनात नियमित व्यायामाचा समावेश करणे आवश्यक आहे. फिजिओथेरपी ही केवळ वेदना कमी करण्यापुरती मर्यादित नसून शरीराची हालचाल सुधारण्यासाठी, स्नायूंची ताकद व लवचिकता वाढविण्यासाठी तसेच दैनंदिन कामकाज अधिक सहजपणे करता यावे यासाठीही उपयुक्त ठरते. वेळेत योग्य मार्गदर्शन व उपचार घेतल्यास अनेक शारीरिक समस्यांचे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच विविध प्रात्यक्षिकांच्या मार्फत उपस्थितांना फिजिओथेरपी उपचार पद्धतीचे मार्गदर्शन केले.
या शिबिराला न्यायालयातील विधीज्ञ व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये सुमारे ४५ विधीज्ञांना व कर्मचा-यांना फिजिओथेरपीविषयक मार्गदर्शन व उपचार देण्यात आले. उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. प्रत्युष बिस्वाल यांनी उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
या उपक्रमामुळे न्यायालयीन अधिकारी, विधीज्ञ आणि कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
न्यायालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य संवर्धन, शारीरिक तक्रारींबाबत जागरूकता आणि फिजिओथेरपी उपचारपद्धतीचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. भविष्यात आवश्यकता भासल्यास अशा आरोग्यविषयक शिबिरांचे पुन्हा आयोजन करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सदर शिबिरास उपस्थित असलेले कुडाळ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष, जी. टी. पडते यांनी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेला शुभेच्छा देवून अशी शिबिरे घेवून विधीज्ञ व कर्मचारी यांना फिजिआथेरपी व त्यावर उपचार पध्दती यांची माहीती दिली जावी अशी विनंती केली. सदर शिबिराचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शनाची सूत्रे एच. ए. कारेकर (क. लिपीक) यांनी पार पाडली. तसेच शिबिरासाठी सर्व व्यवस्था एस. डब्ल्यु. पई, सहायक अधिक्षक (प्रशा.) व के. टी. कदम, व. लिपीक यांनी केली, तसेच कुडाळ न्यायालयातर्फे बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या या उपक्रमाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.