कुडाळ : ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कुडाळात पोलिसांचा रूटमार्च

शेअर करा

कुडाळ,दि.२४ ऑगस्ट

ईद-ए-मिलाद तसेच नारळी पौर्णिमा सणांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि सण-उत्सव शांततेत पार पडावेत, यासाठी कुडाळ पोलिसांकडून सोमवारी शहरात दंगा काबू योजना व रूटमार्च काढण्यात आला.

सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत या संचलनाचे आयोजन करण्यात आले. कुडाळ पोलीस ठाणे येथून या रूटमार्चला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांचे संचलन पोस्ट ऑफिस, बसस्थानक, कुडाळ बाजारपेठ या शहरातील प्रमुख भागांतून करण्यात आले. विविध सणांच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील तसेच गर्दीच्या ठिकाणांचा पोलिसांनी यापूर्वीच आढावा घेतला आहे.

सणांच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची बाजारपेठेत तसेच सार्वजनिक ठिकाणी वर्दळ वाढते. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन, कायदा व सुव्यवस्था तसेच कोणत्याही अनुचित प्रकाराला प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
रूटमार्चच्या माध्यमातून पोलिसांनी शहरातील नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश दिला. सण-उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले.

ईद-ए-मिलाद आणि नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण सामाजिक सलोखा व बंधुभाव जपणारे असल्याने कुडाळ शहरात शांतता आणि सौहार्दाचे वातावरण कायम राहावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले. दरम्यान, कुडाळ पोलिसांच्या या रूटमार्चमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे चित्र दिसून आले. यात ४ पोलीस अधिकारी व ५५ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. हा रूटमार्च कुडाळ पोस्ट आँफीस, बसस्थानक, मुख्य बाजारपेठ, पानबाजार असा काढण्यात आला.

शेअर करा