कुडाळ एमआयडीसीमधील सुरक्षेसाठी पोलीस ऍक्शन मोडवर

शेअर करा

कामगारांची माहिती व चारित्र्य पडताळणी तातडीने करा !

कुडाळ पोलीसांचे एमआयडीसी कंपन्यांना आदेश जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर यांच्या विशेष पाठपुराव्याला यश

कुडाळ, दि. ०७ जुलै

कुडाळ एमआयडीसीमधील उद्योगांची सुरक्षा वाढवण्यासाठी कुडाळ पोलीस ठाण्याने मोठी पावले उचलली आहेत. जिल्हा परिषद सदस्य रुपेश अशोक पावसकर यांनी केलेल्या अर्जानंतर पोलीस प्रशासनाने एमआयडीसीमधील सर्व कारखानदारांना कामगारांची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आणि चारित्र्य पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांनी स्थानिक लोकांच्या मागणीनुसार १६ जून २०२६ रोजी कुडाळ एमआयडीसीमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांना निवेदन दिले होते. त्याच्या अनुषंगाने कुडाळ पोलीस ठाण्याने २९ जून २०२६ रोजी जा. क्र. ४९२०/२०२६ ने उत्तर दिले आहे.
कुडाळ पोलीस ठाण्याच्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, एमआयडीसीमधील सर्व उद्योग/कारखान्यांचे मालक व प्रोप्रायटर यांनी त्यांच्या कंपनीत कामास असलेल्या सर्व कामगार व नोकरांची अद्ययावत वैयक्तिक माहितीचे रेकॉर्ड ठेवावे. तसेच सदर रेकॉर्डची प्रत स्थानिक कुडाळ पोलीस ठाण्यात तातडीने सादर करावी. त्याचबरोबर कामावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर यांची मागणी पूर्ण झाली. या संदर्भात बोलताना जि.प. सदस्य रुपेश पावसकर म्हणाले की, “एमआयडीसीमध्ये बाहेरून येणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. हे बाहेरून कामासाठी येणारी लोक हे दारू, चरस तसेच अमली पदार्थाचे सेवन करतात. तसेच महिलांना छेडतात अशा अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी कामगारांची माहिती व पडताळणी होणे अत्यंत आवश्यक आहे. याची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने आदेश काढले आहेत. एमआयडीसीमधील कंपन्यांनी आता तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा