उपाध्यक्ष अरविंद शिरसाट व संचालक निलेश तेंडुलकर यांच्याकडून शाल, पुष्पगुच्छ व श्रीगणेश प्रतिमा देऊन स्वागत
कुडाळ,दि.२३ ऑगस्ट
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी आज कुडाळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष अरविंद शिरसाट व संचालक निलेश तेंडुलकर यांनी त्यांना शाल, पुष्पगुच्छ व श्रीगणेशाची प्रतिमा देऊन स्वागत व सत्कार केला.
सतीश मराठे यांनी संघाच्या साधना बझार, गॅस विभाग, साधना बाजार पॅकिंग विभाग, खत गोडाऊन यांची पाहणी केली व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. उपाध्यक्ष अरविंद शिरसाट व निलेश तेंडुलकर यांनी घरगुती गॅस वितरण प्रणाली बाबतचे वेळोवेळी बदलणाऱ्या चर्चा केली तसेच ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने गॅस वितरण करण्यात अडचणी येत असल्याबाबत आपले विचार मांडले व निवेदन दिले. सध्याच्या बाजारभावातील चढ उतारावर सुद्धा चर्चा झाली. सतीश मराठे यांनी उपाध्यक्ष व संचालक यांना सहकार क्षेत्रातील व्यावसायिकते बाबत मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार भारती शाखेच्या स्थापनेत सतीश मराठे यांचे बहुमोल योगदान आहे. २०१८ पासून रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी मंडळावर संचालक असून ऑगस्ट २०२४ पासून को-ऑपरेटिव्ह बँकिंग ॲडव्हायझरी कमिटीचे ते प्रमुख सदस्य आहेत. ऑगस्ट २०२४ पासून नाबार्ड या संस्थेवर संचालक म्हणून काम पाहतात. सरकार आणि सहकारी संस्था यामधील दुवा म्हणून त्यांची संपूर्ण भारतात सहकार भारतीच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका असते.