स्त्रीरोगतज्ज्ञांच्या रिक्त पदांमुळे प्रसूती सेवा ठप्प; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई
कुडाळ ,दि.०६ ऑगस्ट
कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात गेल्या कित्येक दिवसांपासून स्त्रीरोगतज्ज्ञांचे पद रिक्त होते. त्यामुळे रुग्णांची मोठी हेळसांड होत होती आणि बाळंतपणाच्या (प्रसूतीच्या) शस्त्रक्रिया व उपचार खोळंबले होते. ही गंभीर बाब निदर्शनास येताच शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत थेट आंदोलनाचा इशारा दिला होता. शिवसेनेच्या या इम्पॅक्टमुळे प्रशासनाला जाग आली असून रुग्णालयात तातडीने दोन स्त्रीरोगतज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील ही बिकट परिस्थिती समजताच शिवसेनेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर कुडाळ महिला बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देऊन रिक्त पदे त्वरित न भरल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. शिवसेनेच्या या इशाऱ्याची प्रशासनाने तातडीने दखल घेतली आणि रुग्णालयात दोन डॉक्टरांची नियुक्ती केली.
असे असेल डॉक्टरांचे कामकाज:
प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार रुग्णालयात सेवा उपलब्ध असणार आहेत.
- डॉ. कुंभारवाड: सोमवार, मंगळवार, बुधवार तसेच महिन्याचा पहिला आणि तिसरा रविवार.
- डॉ. बागडे: गुरुवार, शुक्रवार, शनिवार तसेच महिन्याचा दुसरा आणि चौथा रविवार.
आठवड्याचे साताही दिवस रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्य व विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे स्थानिक नागरिकांनी शिवसेनेचे विशेष आभार मानले आहेत.
हे यश मिळवताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, पंचायत समिती सदस्या ममता राऊळ, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, युवासेना शहर समन्वयक अमित राणे, गुरु गडकर, शैलेश काळप, प्रवक्ते बाळा पावसकर, दत्तगुरु राऊळ, गोट्या चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.